माझ्यासारखीच एसटीही दीर्घायुषी होवो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:15 AM2021-06-01T04:15:57+5:302021-06-01T04:15:57+5:30

चंद्रकांत शेळके लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : महाराष्ट्राच्या रस्त्यावर पहिली एसटी बस धावली तो दिवस होता १ जून १९४८. ...

Long live ST like me ... | माझ्यासारखीच एसटीही दीर्घायुषी होवो...

माझ्यासारखीच एसटीही दीर्घायुषी होवो...

चंद्रकांत शेळके

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : महाराष्ट्राच्या रस्त्यावर पहिली एसटी बस धावली तो दिवस होता १ जून १९४८. आज एसटीला ७३ वर्षे पूर्ण झाली. या काळात एसटीने अनेक स्थित्यंतरे पाहिली. योगायोग म्हणजे पहिली बस नगरहून पुण्यापर्यंत धावली आणि या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मण केवटे हेही नगरचेच. आज ते ९७ वर्षांचे असून एसटीच्या स्थापनादिनानिमित्त त्यांनी माझ्यासारखीच एसटीही दीर्घायुषी होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

‘लोकमत’ने त्यांना पहिल्या एसटीबाबत विचारले असता, त्यांनी ७३ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. आत्ता एसटी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असे नाव असले तरी तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती. तेव्हा गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र मिळून ‘बॉम्बे स्टेट’ होते. त्यामुळे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन असं एसटी महामंडळाचं नाव होतं. ज्या दोन शहरांमध्ये एसटी बस धावली ती भाग्यवान शहर होती अहमदनगर आणि पुणे. नगरच्या माळीवाडा भागातून १ जूनला सकाळी एसटी बस पुण्याकडे धावली. किसन राऊत नावाच्या व्यक्तीला ही पहिली एसटी बस चालवण्याचा बहुमान मिळाला होता. ते आज हयात नाहीत. तर लक्ष्मण केवटे नावाचे गृहस्थ वाहक (कंडक्टर) होते. आज त्यांचं वय ९७ असून ते अगदी ठणठणीत आहेत. हे दोघेही नगरचेच.

या पहिल्या एसटीच्या प्रवासाबाबत सांगताना केेवटे म्हणतात, माळीवाड्यातील लक्ष्मीमाता मंदिराजवळून एसटी बस सुटायच्या. तेव्हा नगरहून पुण्याचे तिकीट होतं अडीच रुपये. वाहकाचा पगार ८० रुपये असायचा, तर आठआणे भत्ता मिळायचा. महामंडळ स्थापन होण्याअगोदर मदिना मोटर्स या संस्थेची बससेवा होती. त्या संस्थेत मी १९४७ मध्ये वाहक म्हणून कामाला सुरुवात केली. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८ला एसटी महामंडळाची स्थापना झाली. त्यानंतर आम्ही मदिनामधून महामंडळाकडे आलो आणि पहिल्या बसचा वाहक होण्याचे भाग्य मला लाभले. माझ्याबरोबर त्या बसचे चालक होते किसनराव राऊत. तेही नगरचेच. आम्ही दोघांनी १ जून १९४८ रोजी सकाळी आठ वाजता माळीवाडा स्टँडवर गाडी आणली. त्यावेळी बसची आसनक्षमता ३० प्रवाशांची होती. वाहतूक अधिकारी दादासाहेब मिरीकर यांनी गाडीला मोठा हार घातला. गाडीची हळदी-कुंकवाने पूजा करून नारळ वाढविण्यात आला. स्टँडवर भलीमोठी पितळी घंटा होती. ती वाजवून ठीक सकाळी ८ वाजता गाडी सोडण्यात आली. त्या दिवशी २३ प्रवासी पुण्यासाठी नगरहून बसले. तर पुढे चास, कामरगाव, सुपा येथून ७ प्रवासी घेतले व गाडी फुल्ल झाली.

पहिल्या एसटी बसचा वाहक असल्याचा मला अभिमान आहे. बारा वर्षे वाहक, बारा वर्षे कंट्रोलर, १२ वर्षे निरीक्षक अशी ३६ वर्षे सेवा करून १९८४ साली मी एसटीतून निवृत्त झालो. विशेष म्हणजे आज ७३ वर्षांनंतर त्या वेळचा एकही कर्मचारी हयात नाही. परमेश्वर कृपेने मी आज ९७ वर्षीही ठणठणीत आहे. कोणतेही व्यसन नसल्याने मी निरोगी आहे. माझ्यासारखेच दीर्घायुष्य एसटीला लाभो हीच स्थापना दिनानिमित्त सदिच्छा...

---------

अशी होती पहिल्या एसटीची रचना

पहिल्या एसटी बसची बॉडी (रचना) आजच्यासारखी लोखंडी नव्हती. ती एक लाकडी बॉडी होती आणि वरून कापडी छत असायचे. पेट्रोलवर चालणारी ही बेडफोर्ड कंपनीची गाडी होती. बसची आसन क्षमता ३० प्रवाशांची होती.

-------

माळीवाड्यातील लक्ष्मीमाता मंदिरासमोरून त्यावेळी बस सुटायच्या. मंदिरासमोर भलेमोठे लिंबाचे झाड होते. त्याला अडकवलेल्या घंटेच्या आवाजाने प्रवासी यायचे. जवळच असलेल्या लोकल बोर्डाच्या (आताची जिल्हा परिषद) इमारतीवर भले मोठे घड्याळ (जे आजही आहे) होते. त्याच्या वेळेनुसार या बस सुटायच्या. कालौघात ते लिंबाचे झाड आता राहिलेले नाही. मात्र तेथे असलेले चिंचेचे झाड अजूनही मंदिर परिसरात आहे.

--------

विशेष बाब म्हणून निवृत्तीवेतन मिळावे

केवटे हे पहिल्या एसटीचे एकमेव साक्षीदार आहेत. त्यांना सध्या एसटीकडून निवृत्तीवेतन मिळत नाही. एसटी प्रवासाचा पास तेवढा आहे. एसटीच्या जडणघडणीत किंवा भरभराटीसाठी इमाने-इतबारे ३६ वर्षे सेवा देणाऱ्या या व्यक्तीला महामंडळाने खास बाब म्हणून निवृत्तीवेतन द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.

-----------

फोटो - ३१लक्ष्मण केवटे १

३१एसटी बस

३१ केवटे सत्कार

नगरमध्ये झालेल्या एसटीच्या अधिवेशनात लक्ष्मण केवटे यांचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.

Web Title: Long live ST like me ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.