उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा लाँगमार्च मागे
By अरुण वाघमोडे | Published: October 4, 2023 07:26 PM2023-10-04T19:26:10+5:302023-10-04T19:26:21+5:30
अहमदनगर : मंत्रालयात १० ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक निश्चित केल्याचे पत्र दिल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी नगर ते ...
अहमदनगर : मंत्रालयात १० ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक निश्चित केल्याचे पत्र दिल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी नगर ते मंत्रालयापर्यंत काढण्यात आलेला लाँगमार्च मागे घेतला. बुधवारी सकाळी ११ वाजता आमदार संग्राम जगताप यांनी भाळवणी येथे आंदोलकांशी चर्चा करत मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचा तपशील सांगितला. त्यानंतर हा लाँग मार्च स्थगित करत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे यांनी सांगितले.
सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने २ ऑक्टोबरपासून नगर ते मुंबई लाँगमार्च सुरू केला होता. भाळवणीपर्यंत हा लाँगमार्च पोहोचला होता. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता मनपाचे कामकाज ठप्प झाले होते. मंगळवारी आ. संग्राम जगताप यांनी तातडीने मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मनपा कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी केली.
त्यानुसार पवार यांनी १० ऑक्टोबर रोजी मंत्रालयात (मुंबई) वित्त व नियोजन विभागात सकाळी साडेदहा वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारस लागू करणे, लाड, सफाई कामगार वारसा हक्काने सेवेत सामावून घेणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे.