लोणी व्यंकनाथ, पारगावला पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:21 AM2021-05-08T04:21:45+5:302021-05-08T04:21:45+5:30
श्रीगोंदा : कुकडी लाभक्षेत्रातील पारगाव सुद्रिक व लोणी व्यंकनाथ (ता.श्रीगोंदा) या दाेन गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ...
श्रीगोंदा : कुकडी लाभक्षेत्रातील पारगाव सुद्रिक व लोणी व्यंकनाथ (ता.श्रीगोंदा) या दाेन गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. दोन्ही गावचे तलाव कोरडे पडल्याने पाणी योजनाही निकामी ठरत आहेत.
विसापूर तलावातून आर्वतन सुरू आहे. हे पाणी कुकडीच्या १३२ कालव्यांतून लोणी व्यंकनाथच्या गावठाण बंधाऱ्यात सोडले तर येथील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. गावासाठी ८५ लाखांची पाणीपुरवठा योजना झाली आहे. मात्र, तरीही गावातील नळांना आठ आठ दिवस पाणी येत नाही. वाड्या वस्त्यांवर पाईपलाईन झाली. मात्र, कुठेही कनेक्शन नाही. त्यात आता पाणीटंचाई झाल्याने महिलांना पाण्यासाठी फिरावे लागत आहे.
पारगाव सुद्रिक गावासाठी मडकेवाडी तलावावरून पाणीपुरवठा योजना करण्यात आली. मात्र, मडकेवाडी तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपासून पारगाव सुद्रिक गावाचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. कुकडीचे आवर्तन सुटल्यानंतर मडकेवाडी व सुद्रिकेश्वर तलावात पाणी सोडावे, अशी मागणी मंगेश घोडके, खंडू आरू, भीमराव मोटे यांनी केली आहे.
---
लोणी व्यंकनाथ गावची लोकसंख्या १४ हजार आहे. गावात एक कोविड सेंटर चालू आहे. सध्या गावठाण व कोविड सेंटरसाठी टँकरने पाणी आणावे लागत आहे. तरी विसापूरचे पाणी गावठाण तलावात सोडणे आवश्यक आहे. यासंदर्भात तहसीलदार प्रदीप पवार यांनी कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांना आदेश द्यावेत.
- रामदास ठोंबरे,
सरपंच, लोणी व्यंकनाथ.
---
पारगाव व लोणी व्यंकनाथ येथील पाणीटंचाईचा पाहणी करून आढावा घेऊ. नागरिकांना पिण्याचे पाणी कसे उपलब्ध करून देता येईल, यावर प्रशासन योग्य निर्णय घेईल.
-प्रदीप पवार,
तहसीलदार, श्रीगोंदा