पाथर्डीमध्ये खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट : उशीराने दर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:44 AM2018-10-05T10:44:48+5:302018-10-05T10:44:57+5:30
तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शहरातील कोरडगाव रोडवर चालवण्यात येणा-या इंडिअन आॅईल कंपनीच्या पंपावर आज सकाळपर्यत दर कमी करण्यात आले नव्हते
पाथर्डी : तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शहरातील कोरडगाव रोडवर चालवण्यात येणा-या इंडिअन आॅईल कंपनीच्या पंपावर आज सकाळपर्यत दर कमी करण्यात आले नव्हते. त्यामुळे या पंपावर ग्राहकांची लूट सर्रासपणे सुरुच होती. गुरुवारी मध्यरात्रीपासून शासनाने पेट्रोल पाच रुपये आणि डीझेलचे दर अडीच रूपयाने कमी केले असतानाही आज सकाळी ९ वाजेपर्यंत दर कमी करण्यात आले नव्हते. याबाबत ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार खरेदी विक्री संघाचे माजी संचालक सीताराम बोरुडे यांनी इंडिअन आॅईल कंपनीकडे केली आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर अडीच रुपयांची कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातही पेट्रोल पाच तर डीझेल अडीच रुपयांनी गुरुवारी कमी करण्यात आले. हा निर्णय झाल्याबरोबर संबधित पेट्रोल वितरीत करणा-या पेट्रोल कंपन्या, त्या अंतर्गत येणारे पेट्रोल पंपांनी इंधनाचे दर कमी करणे बंधनकारक होते. परंतु पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघाच्या अंतर्गत चालवण्यात येणा-या इंडियन आॅईल कंपनीच्या पंपावर आज सकाळी ९ वाजेपर्यंत पूर्वीच्याच दराने पेट्रोल प्रतिलीटरला ९१ रुपये ५० पैसे तर डिझेल ७९ रुपयांप्रमाणे दर आकारणी ग्राहकाकडून करण्यात येत होती. याबाबत खरेदी विक्री संघाचे माजी संचालक तथा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे यांनी इंधनाचे दर कमी होवूनही पंपचालकाकडून ग्राहकांची लूट होत असल्याबाबत पंप चालकास धारेवर धरले. इंधनाचे दर कमी होवूनही अनेक ग्राहकांना पूर्वीच्याच दराने विक्री होत असल्याचे लक्षात येताच इतरही ग्राहकांनी पंपचालकाविरुद्ध तक्रारीचा पाढा वाचला मात्र पंपाचे व्यवस्थापक विभाकर बारवकर हे पंपावर आलेच नाही. पूर्वीच्या दराने इंधन खरेदी करण्यास ग्राहक तयार नसल्याने साडे आठ वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत पंपावर ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.
‘‘खरेदी विक्री संघाच्या पंपावरून छुप्या रीतीने ग्राहकांची लुट केली जात आहे. याबाबत कंपनी कडे तक्रार केली आहे.’’- सीताराम बोरुडे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी जिल्हा
‘‘इंधन दर कपाती बाबत इंधन कंपनीकडून विभाग प्रमुखांना सकाळी उशीरा संदेश आला. त्यामुळे उशिराने दर कमी केले’’ -विभाकर बारवकर, व्यवस्थापक
‘‘दर कपात झाल्याने रात्री बारा वाजता दर कमी करणे अपेक्षित होते. याबाबत व्यवस्थापक बारवकर यांना सांगितले होते. परंतु सकाळी दर कपात केले आहेत’’ - दत्तात्रय शिरसाठ, विभाग प्रमुख