"राम आपलाय, बहुजनांचा; शिकार करुन खाणारा मांसाहारी राम"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 08:31 PM2024-01-03T20:31:49+5:302024-01-03T23:40:12+5:30
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक विधान करुन नवा वाद निर्माण केला आहे.
मुंबई - अयोध्येतील प्रभू रामाचे मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते रामलला भव्य-दिव्य मंदिरात विराजमान होतील. देशभरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून गावागावात हा सोहळा आयोजित केला जात आहे. पंतप्रधान मोदींनीही या दिवशी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन देशावासीयांना केलं आहे. त्यामुळे, प्रभू श्रीराम आणि अयोध्या हा सध्या राजकीय मुद्दा बनला आहे. भाजपासह विरोधकही राम सांगत आहेत. त्यातच, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक विधान करुन नवा वाद निर्माण केला आहे.
प्रभू श्रीराम हे बहुजनांचे होते, तसेच ते मांसाहारी होते, असे म्हणत आव्हाड यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन वाद निर्माण केला आहे. आता, त्यांच्या या विधानावर भाजपा नेते किंवा रामभक्त काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे.
शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, आव्हाड व्यासपीठावरुन बोलत होते. ''आपण हा इतिहास तुम्ही वाचत नाही. राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करुन खाणारा राम तो आमचा आहे, बहुजनांचा. तुम्ही तिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात. पण, त्या रामाचा आम्ही आदर्श पाळतो आणि मटन खातो आहोत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. राम हा शाकाहारी नव्हताच, तो मांसाहारी होता. १४ वर्षे जंगलात जाणारा माणूस कुठे जाणार शाकाहारी अन्न शोधायला, मी जे बोलतो ते खरंच बोलत असतो'', असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नवा वाद निर्माण केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित,ज्योत निष्ठेची या शिबिरातून #Livehttps://t.co/f0l1PqvJ5k
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 3, 2024
दरम्यान, राम मंदिर सोहळ्याला केवळ व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण देण्यात आल्याचं विधान भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावरही जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार करताना राम मंदिरा कुणाच्या बापाची जहागीर नाही, असे म्हटले होते.
निमंत्रणावरुन काय म्हणाले होते आव्हाड
मंदिर कुणाच्या बापाची मालमत्ता नाही. ही बापाची मालमत्ता होती तेव्हाच चार्तुवर्ण, क्षुद्र जन्माला आले आणि त्यांना देवळाच्या बाहेर उभं करण्यात आले. तुम्ही आजपण आम्हाला देवळाच्या बाहेर उभं करणार?, तुम्ही आजपण आम्हाला आमंत्रण देणार नाही? आणि परत चार्तुवर्णाची निर्मिती होणार. तुमच्या आमंत्रणाची आणि तुम्ही बोलवण्याची वाट बघणारे आम्ही नाही. आम्हाला जेव्हा जायचे असेल तेव्हा रामाचे नाव घेऊन राम मंदिरात जाऊ. राम कुणाच्या बापाची मालमत्ता नाही. आमंत्रण आलं का? ही कुठली नवीन संस्कृती, तुमच्या आमंत्रणाची वाट बघणार नाही. आम्हाला जायचे तेव्हा मंदिरात जाऊ, असं त्यांनी म्हटलं होतं.