स्फोटात ३ लाखांची हानी
By Admin | Published: May 21, 2014 12:10 AM2014-05-21T00:10:35+5:302024-10-01T23:13:04+5:30
श्रीरामपूर: श्रीरामपूरच्या प्रभाग २ मधील लकी मुस्लीम हॉटेलमध्ये रेफ्रिजरेटरच्या काँप्रेसरचा मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्फोट होऊन सुमारे ३ लाख रूपयांच्या साहित्याचे नुकसान झाले.
श्रीरामपूर: श्रीरामपूरच्या प्रभाग २ मधील लकी मुस्लीम हॉटेलमध्ये रेफ्रिजरेटरच्या काँप्रेसरचा मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्फोट होऊन सुमारे ३ लाख रूपयांच्या साहित्याचे नुकसान झाले. मुसा अहमद व्यापारी संकुलाच्या तळमजल्यात हे हॉटेल आहे. दुपारी ४ वाजेच्या सुमारास हॉटेलच्या सर्वात मागच्या बाजूस असलेल्या गोदामवजा गाळ्यातील फ्रिजच्या काँप्रेसरचा हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज आल्यानंतर हॉटेलचे चालक हाजी शरीफ खान व त्यांचे सहकारी पुढच्या भागातून पळत बाहेर रस्त्यावर आले. त्यांनी स्फोट ज्याठिकाणी त्याठिकाणाकडे धाव घेतली, तेव्हा तेथे आग लागल्याचे दिसले. आगीची पर्वा न करता खान व त्यांच्या सहकार्यांनी तेथे असलेले स्वयंपाकाच्या गॅसच्या चार टाक्या पटापट या ठिकाणाहून दूर नेल्या. स्फोटामुळे शॉर्टसर्कीट होऊन हॉटेलमधील व हॉटेलच्या बाहेरील विद्युत साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. तसेच दुकानात असलेल्या फ्रिजसह इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचाही पूर्णपणे कोळसा झाला. याच हॉटेलच्या शेजारच्या गाळ्यात हाजी रफिक महंमद बागवान यांची नौसीन बुरखा हाऊस आहे. या दुकानातील बुरखे व इतर बाहेर लटकवलेले कपडेही जळून खाक झाले. घटनेची माहिती समजताच श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्निशामक बंबांनी घटनास्थळी येऊन आग विझविली. ज्येष्ठ कार्यकर्ते हाजी रमजानी शेख, जलीलखान पठाण, अहमद जहागीरदार आदींनी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात या जळिताची नोंद नव्हती. (प्रतिनिधी)