कोपरगाव तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:33 AM2020-03-26T11:33:19+5:302020-03-26T11:34:34+5:30
कोपरगाव शहरासह तालुक्यात बुधवारी ( दि.२५ मार्च) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सर्वदूर विजांच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतक-यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोपरगाव : कोपरगाव शहरासह तालुक्यात बुधवारी ( दि.२५ मार्च) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सर्वदूर विजांच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतक-यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोपरगाव तालुक्यातील सर्व गावात बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरवात झाली. काही गावात तुरळक तर पूर्व भागातील सर्वच गावात तब्बल दोन तास वादळीवा-यासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील उभ्या तसेच सोंगणी केलेल्या गहू, हरभरा, कांदा, पिकांचे व डाळिंबासह इतर फळबागांच नुकसान झाले. याशिवाय जनावरांसाठी साठवणूक केलेला ज्वारी, मक्याचा कोरडा चा-याचे नुकसान झाले. बुधवारी पाऊस सुरु झाल्यानंतर कोपरगाव येथील वीज केंद्रावर बिघाड झाल्याने शहरात रात्री साडेदहा वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र ग्रामीण भागातील वारी येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राला कोपरगावहून विद्युत पुरवठा करणारा सवंत्सर येथे वीजवाहक तारांचा खांब वादळात पडला आहे. यामुळे वारी, कान्हेगाव या गावांचा वीज पुरवठा अद्यापपर्यंत खंडित आहे.
दरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी बुधवारी रात्रीच दखल घेत तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी संपर्क साधून शेतक-यांच्या पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. या आस्मानी संकटाने शेतकºयांनी खचून न जाता धीर धरावा. शासन आपल्याबरोबर आहे, असे आवाहन केले आहे. मात्र अचानक आलेल्या या अस्मानी संकटाने शेतकरी पूर्णत: मेटाकुटीला आला आहे.