मन हरवलेली हवाईसुंदरी भरारी घेण्यास झाली सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:18 AM2021-04-12T04:18:43+5:302021-04-12T04:18:43+5:30

अहमदनगर : शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलीचं हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. आयुष्यात आणखी उंच झेप घेण्याचं ध्येय तिने ...

The lost air hostess was ready to take off | मन हरवलेली हवाईसुंदरी भरारी घेण्यास झाली सज्ज

मन हरवलेली हवाईसुंदरी भरारी घेण्यास झाली सज्ज

अहमदनगर : शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलीचं हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. आयुष्यात आणखी उंच झेप घेण्याचं ध्येय तिने निश्चित केलं होतं. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने मात्र तिच्याकडील सर्व पैसे लाटले. या घटनेचा तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. हायप्रोफाईल जीवन जगणारी ती तरुणी अखेर मनोरुग्ण होऊन रस्त्यावर भटकंती करू लागली. येथील मानवसेवा संस्थेने दिलेल्या आधारातून मन हरवलेली ''ती'' हवाईसुंदरी पुन्हा आयुष्यात भरारी घेण्यास सज्ज झाली आहे.

ही व्यथा आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील शेतकरी कुटुंबातील सीमा (नाव बदले आहे) या तरुणीची. सीमा २०११मध्ये हवाई सुंदरी म्हणून परदेशातील एका एअरलाइन्स कंपनीमध्ये रुजू झाली. चांगल्या पगाराची नोकरी आणि हायप्रोफाईल लाइफ! असे आनंदी आयुष्य ती जगू लागली. नोकरी करत असताना सीमाची राजस्थानमधील एका तरुणाशी मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्या तरुणाने सीमाला लग्नाचे आमिष दाखविले. त्याच्यासोबत सुखी संसाराचे स्वप्न ती पाहू लागली. सीमा हिच्या आयुष्यात पुढे मात्र वेगळेच वाढवून ठेवले होते. एक दिवस संधी साधून त्या तरुणाने सीमाकडील सर्व चोरून पसार झाला. या घटनेचा सीमा हिला जबरदस्त मानसिक धक्का बसला. यातून तिने सावरण्याचा प्रयत्न करत केरळ येथील एका तरुणाशी विवाह केला. काही दिवसांनंतर तिने एका बाळालाही जन्म दिला. आधी घडलेल्या घटनेची विचार मात्र सीमाच्या मनात वारंवार येत होता. यातूनच ती मनोरुग्ण झाली आणि अवघ्या सात दिवसाचे बाळ आणि पतीला सोडून ती घराबाहेर पडली. आत्महत्येचे विचार तिच्या मनात येऊ लागले. भटकंती करत शेवटी सीमा अमळनेर येथे आई-वडिलांकडे आली. आई भोळसर तर वडील ह्रदयाच्या आजाराने ग्रस्त. त्यामुळे माहेरीही तिची जबाबदारी घेण्यास कोणीच नव्हते. मन हरवलेली सीमा रस्त्यावर फिरून जीवन कंठत होती. सीमाची ही व्यथा अमळनेर येथील अ‍ॅड. तिलोत्तमा पाटील व संजय पाटील यांना समजली. त्यानी अमळनेर येथील अविनाश मुंडके यांच्याशी संपर्क करुन सीमा हिला १३ जानेवारी २०२१ रोजी अहमदनगर येथील मानवसेवा प्रकल्पात दाखल केले. या ठिकाणी सीमा हिच्यावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनय क्षीरसागर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, मानसशास्त्रज्ञ प्रा. डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांनी उपचार करत तिचे समुपदेशन केले. उपचारानंतर काही दिवसातच सीमा सावरली. मानवसेवा प्रकल्पाचे संचालक दिलीप गुंजाळ यांना सीमा हिने तिच्या आयुष्यात घडलेली व्यथा सांगितली.

...............

सावरलेली सीमा कुटुंबात दाखल

मानवसेवा प्रकल्पात मिळालेले योग्य उपचार आणि समुपदेशनामुळे सीमा पूर्णपणे सावरली. आई-वडील, पती आणि बाळाच्या आठवणीने ती व्याकूळ होऊ लागली. संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ, अनिता मदणे, सिराज शेख, प्रसाद माळी यांनी दोन दिवसांपूर्वी सीमा हिला अमळनेर येथे तिच्या आई-वडिलांकडे पोहोच केले. तसेच पतीशीही सीमा हिचा संवाद घडवून आणला. आई- वडिलांना पाहताच सीमाला अश्रू अनावर झाले.

.............

हवाई सुंदरी म्हणून आयुष्य जगणाऱ्या तरुणीच्या वाटायला अतीव वेदना आणि दुःख आले. मानव सेवा प्रकल्पात दाखल झाल्यावर त्या तरुणीवर योग्य उपचार करून तिचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर ती सावरली. त्यानंतर तिला तिच्या आई-वडिलांच्या दाखल करण्यात आले.

-दिलीप गुंजाळ, संस्थापक मानव सेवा प्रकल्प

Web Title: The lost air hostess was ready to take off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.