तत्त्वनिष्ठ, दिलदार मित्र गमावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:59 AM2021-02-20T04:59:01+5:302021-02-20T04:59:01+5:30
श्रीगोंदा : सर्वसामान्यांसाठी अडचणीच्या काळात धावून जाणारे, कार्यकर्त्यांची खडान् खडा माहिती असणारे, स्पष्टवक्ते अशी ओळख असणारे जिल्हा परिषद सदस्य ...
श्रीगोंदा : सर्वसामान्यांसाठी अडचणीच्या काळात धावून जाणारे, कार्यकर्त्यांची खडान् खडा माहिती असणारे, स्पष्टवक्ते अशी ओळख असणारे जिल्हा परिषद सदस्य सदाशिव (सदाअण्णा) पाचपुते यांच्या निधनाने श्रीगोंदा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. तत्त्वनिष्ठ, दिलदार मित्र गमावला, अशा भावना तालुक्यातील राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या.
सदाशिव पाचपुते हे कलियुगातील खरे लक्ष्मण होते. आपल्या बंधूला आमदार, मंत्री करण्यासाठी त्यांनी कायम खिंड लढविली. विरोधी पक्षातील नेत्यांशीही मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले, अशा शब्दांत माजी आ. राहुल जगताप यांनी आदरांजली वाहिली.
पाचपुते घराणे आमचे राजकीय विरोधक होते. मात्र, सदाशिव पाचपुते यांनी कधीच तत्त्वाचे राजकारण सोडले नाही. अलीकडच्या काळात त्यांनी आपली जहाल भूमिका मवाळ केली होती, अशी प्रतिक्रिया नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केली.
सदाअण्णा विरोधक असले तरी एक सच्चे मित्र होते. त्यांच्या निधनाने धक्का बसला आहे. असा मित्र होणे नाही, अशी भावना माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब भोस यांनी व्यक्त केली.
सदाअण्णा हे आधार देणारे परममित्र होते. त्यांनी मला अनेक संकटांत मदत केली. सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम केले. यातून आयुष्यभर उतराई होऊ शकणार नाही, अशी आठवण बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी जागविली.
सदाअण्णा हे राजकारणातील पाठीराखा होते. त्यांनी स्वत:साठी नव्हे तर संघटनेसाठी आयुष्य घालविले, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांनी व्यक्त केली. जिल्हा बँकेला मी सेवा सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढविणार होतो. मात्र, सदाअण्णा आजारी पडले. त्यामुळे आपल्याला मदत कोण करणार ही भावना मनात आली व मी निर्णय बदलला. माझा आधारच तुटला, अशी भावना जिल्हा बँक संचालक दत्तात्रय पानसरे यांनी व्यक्त केली.
----
१९ सदाशिव पाचपुते