प्रेमासाठी ‘एकच’ दिवस नसतो : कावळाप्रेमी मनोहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:47 AM2019-02-14T10:47:34+5:302019-02-14T10:47:52+5:30
निसर्गाच्या सानिध्यात परंतु आपल्या अवतीभोवती असणारे ठराविक पशू - पक्षी आपण माणसाळतात म्हणून पाळतो किंवा आपल्या अवती-भवती वावरत असतात.
निसर्गाच्या सानिध्यात परंतु आपल्या अवतीभोवती असणारे ठराविक पशू - पक्षी आपण माणसाळतात म्हणून पाळतो किंवा आपल्या अवती-भवती वावरत असतात. त्यामधे पशू म्हटले तर सर्वच पाळीव प्राणी तर पक्षात खास करून पोपट, कबूतर, चिमणी, पारवं यांच्यावर प्रेम करणारी माणसं आपण पाहिली. मात्र कावळ््यांवर प्रेम करून त्यांचे सर्व लाड पुरविणारी व्यक्तीही आहेत.
कोपरगाव तालुक्यातील वारी (साकरवाडी) येथील मनोहर दत्तु महाले गेल्या सहा वर्षांपासून दररोज ४० ते ५० कावळ्यांचे लाड पुरवत आहेत. दररोज सकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान सर्व कावळे महाले यांच्या प्रेमापोटी एकाच ठिकाणी जमा होतात. विशेष म्हणजे ते महाले यांच्या मोटारसायकलच्या हॉर्नच्या आवाजाची वाट बघत असतात. हॉर्न वाजला रे वाजला की, सर्व कावळे जमिनीवर एका ठिकाणी जमा होतात. ‘चला रे’ असा आवाज दिल्यानंतर जवळच असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कावळे जाऊन येतात. शेव-चिवड्याचा खाऊ घेण्यासाठी मनोहर यांच्या अंगा - खांद्यावर लगबग करतात. आपला खाऊ घेतात व पाणी पिण्यासाठी जवळच असलेल्या मनोहर यांच्या घरी दिवसभर ये जा करत असतात.
एकंदरीतच इतर पक्षाच्या तुलनेत कावळा हा चतुर पक्षी. त्यामुळे सर्वच काना डोळा करतात. परंतु त्यालाही मायेने प्रेमाने जवळ घेतल्यास तोही जवळ येतो हे मनोहर महाले यांनी प्रत्यक्षात करून दाखवलेले वास्तवच आहे.
- रोहित टेके, कोपरगाव