Valentines Day: प्रेम फक्त व्यक्तीवरच होत नसतं राव; 'हे' आहे खाकीवर ‘प्रेम’ करणारं गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:53 AM2019-02-14T10:53:19+5:302019-02-14T14:44:17+5:30

नगर तालुक्यातील बारदरी हे छोटंस गर्भगिरीच्या कुशीत वसलेले टुमदार गाव. गावातील लोकसंख्या सुमारे १ हजार १०३. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे गावातून तब्बल १५ ते २० तरूण लष्करात देशसेवा करत आहेत तर ६० ते ७० मुले पोलीस दलात कार्यरत आहेत.

Love does not have 'single day': Khaki on 'Love' village | Valentines Day: प्रेम फक्त व्यक्तीवरच होत नसतं राव; 'हे' आहे खाकीवर ‘प्रेम’ करणारं गाव

Valentines Day: प्रेम फक्त व्यक्तीवरच होत नसतं राव; 'हे' आहे खाकीवर ‘प्रेम’ करणारं गाव

नगर तालुक्यातील बारदरी हे छोटंस गर्भगिरीच्या कुशीत वसलेले टुमदार गाव. गावातील लोकसंख्या सुमारे १ हजार १०३. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे गावातून तब्बल १५ ते २० तरूण लष्करात देशसेवा करत आहेत तर ६० ते ७० मुले पोलीस दलात कार्यरत आहेत. या गावातील काही कुटुंबांचा अपवाद वगळता प्रत्येक कुटुंबातील एक, दोन असे सदस्य पोलीस व आर्मी दलात कार्यरत आहेत. खाकीवर प्रेम करणाऱ्या या गावात तरूण मुले पोलीस सेवेसाठी धडपडत आहेत.

निसर्गरम्य वातावरणाचे कोंदण लाभलेले बारदरी गाव डोंगराळ आहे. आजूबाजूला हिरवीगार गर्द झाडांनी वेढलेल्या या गावात पोलीस भरतीची पूर्व तयारी करण्यासाठी मोकळे मैदान, त्याचबरोबर बारदरी गाव ते चाँदबिबी महाल या दरम्यानचा रस्ता मुलांना धावण्यासाठी व व्यायामासाठी उपयोगी ठरत आहे. पोलीस भरतीचा सराव आणि कसदार शरीर कमवण्यासाठी या गावाची माती पोषक ठरली आहे . मागील पाच वर्षापासून या गावातील सर्वाधिक मुले पोलीस भरतीत भरती झाली आहेत. या गावातील पोलीस नाईक दत्तात्रय पोटे, युवराज पोटे, संजय पोटे, राम पोटे, गणेश पोटे, सचिन पोटे हे तरुण सध्या पोलीस दलात कार्यरत आहेत. हे गावाकडे सुटीला आल्यानंतर गावातील तरुणांना एकत्र करुन पोलीस दलाविषयी माहिती व पोलीस दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. तरुणांकडून पोलीस दलात भरती होण्यासाठी मैदानी तयारी व सराव करुन घेतात. एखादा तरुण जर मैदानात कोणत्या ठिकाणी कमी पडत असेल तर त्याची सर्व तयारी करून घेतली जाते . त्या तरूणाने मैदानी चाचणीत पूर्ण सक्षम व्हावे यासाठी सर्वच झटत असतात. या गावात सध्या एक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी यांची संख्या ६० ते ७० च्या घरात आहे. गावातील तरुणांना खाकी वर इतके प्रेम जडले आहे की प्रत्येक जण पोलीस खात्यात नोकरी करण्याचे स्वप्न पाहून तयारी करत आहे.


बारदरी गावातील अनेक तरुण पोलीस दलाच्या माध्यमातून राज्यात विविध ठिकाणी आपले कर्तव्य बजावत आहेत. आज गावातील अनेक तरूणांचे पोलीस नोकरीवर प्रेम जडले आहे. पोलीस होण्यासाठी गावात तरुणांची नेहमी धडपड सुरू आहे. गावातील तरूण पोलीस दादा होऊन देशसेवा करीत आहे याचा गावाला अभिमान वाटतो. - सुधीर पोटे, माजी सरपंच, बारदरी


- योगेश गुंड, अहमदनगर

 

Web Title: Love does not have 'single day': Khaki on 'Love' village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.