इन्स्टाग्रामवर प्रेम जडले, प्रेमासाठी मुलींनी परराज्य गाठले; पोलिसांनी शोधून आणले!
By साहेबराव नरसाळे | Published: December 17, 2023 04:47 PM2023-12-17T16:47:31+5:302023-12-17T16:48:22+5:30
नगर शहरातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या दोन मुली इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी झालेल्या ओळखीतून त्या मुलांच्या प्रेमात पडल्या.
अहमदनगर : इंस्टाग्रामवरून अनोळखी मुलांशी ओळख झाली. इंस्टाग्रामवरच चॅटींगच्या माध्यमातून प्रेम जुळले. मग प्रेमासाठी त्यांनी घरातून पलायन करत थेट परराज्य गाठले. आई-वडिल, नातेवाईकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात मुली हरवल्याची फिर्याद दिली. शेवटी पोलिसांनी परराज्यातून या मुलींना शोधून आई-वडिलांच्या हवाली केले. मुलींचा शोध लागला. पण आई-वडिलांनीही आपल्या मुला-मुलींवर लक्ष ठेवायला हवे, असे आवाहन कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.
नगर शहरातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या दोन मुली इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी झालेल्या ओळखीतून त्या मुलांच्या प्रेमात पडल्या. या मुलांसाठी त्या दोघीही घरातून निघून गेल्या. पालकांनी शोधाशोध केली. मात्र सापडल्या नाहीत. त्यानंतर पालकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्यादी दिल्या. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी एका मुलीला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवरून आणले व पालकांच्या हवाली केले. त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या शोधासाठी पथक पाठविण्यात आले. ही मुलगी मराठवाड्यात असल्याची माहिती पोलिसांनी तांत्रिक तपसातून काढली. त्यानंतर पोलिसांनी तिलाही शोधून आणत पालकांच्या स्वाधीन केले. मुलींचा तपास लावल्यानंतर नागरिकांनी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस जवान विश्वास गाजरे, रवी टकले, प्रमोद लहारे, सचिन लोळगे यांचा सत्कार केला.
पोलिसांना पाहताच मुलींना पश्चाताप
सोशल मिडीयावर दिखाव्याच्या खोट्या गोष्टींमध्ये गुंतवून मुलींना अलगद जाळ्यात फसवले जाते. अशा दिखाव्याला मुली बळी पडतात. घरातील आई, वडील, नातेवाईकांचा जराही विचार न करता त्या खोट्या प्रेमाच्या दिखाव्याला भुलतात. मात्र यातून कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागतो. बदनामी अटळ होते. जेंव्हा पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेतले तेंव्हा त्यांना आपण खूप मोठी चूक केली असल्याची कबुली देत आपल्याला पश्चाताप होत असल्याचे मुलींनी सांगितले.
पालकांनी मुला-मुलींचे मित्र व्हावे
पालकांनी आपल्या पाल्यांवर कायम लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाबाबत वेळोवेळी संवाद साधावेत. पालकांचे आपल्या पाल्याशी मैत्रीपूर्ण संबंध असावेत. मुलांमध्ये फक्त भीती नको तर, आदरयुक्त भीती असावी, आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.