औद्योगिक विजेचे दर कमी करणार
By Admin | Published: April 26, 2016 11:22 PM2016-04-26T23:22:41+5:302016-04-26T23:27:01+5:30
कोपरगाव : यापुढे महाराष्ट्रात मागेल त्याला वीज जोड देण्याची भूमिका शासनाची आहे़
कोपरगाव : यापुढे महाराष्ट्रात मागेल त्याला वीज जोड देण्याची भूमिका शासनाची आहे़ त्याच बरोबर औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या विजेचे दर कमी करण्याची भूमिका शासनाची असणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली़
कोपरगाव शहरातील उच्च दाब, लघु दाब भूमिगत वाहिनेचे भूमिपूजन तसेच तालुक्यातील कोकमठाण व तळेगाव मळे येथे ३३ केव्हीए विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले़ यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार स्नेहलता कोल्हे होत्या़ संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, नगराध्यक्ष रवींद्र पाठक, सभापती सुनील देवकर, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, तहसीलदार इंदिरा चौधरी, कैलास जाधव, दिलीप दारुणकर आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती़
भूमिगत वाहिनीमुळे जे रस्ते खोदले जातील, ते पुन्हा दुरुस्त करून देण्याचे काम वीज वितरण कंपनी करणार असल्याचे सांगून ऊर्जा मंत्री बावनकुळे म्हणाले, गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात आ़ स्नेहलता कोल्हे यांनी प्रत्येक विभागातून कोपरगाव तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला़ कोपरगावच्या जनतेने चांगला लोकप्रतिनिधी निवडला, याबद्दल जनतेचे अभिनंदन केले पाहिजे़ कोपरगाव शहराच्या भूमिगत वाहिनीच्या कामासाठी सध्या तीन कोटी रुपये दिले आहेत, त्यात आणखी सात कोटी रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केले़ हे काम एकूण ४५ कोटी रुपयांचे आहे़ पुढील निधी टप्प्या- टप्प्याने देवू, चालू पंचवार्षिक नंतर विजेसंदर्भात एकही समस्या राहणार नसल्याची ग्वाही मंत्री बावनकुळे यांनी दिली़
आ़ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव शहरात घरगुती व व्यावसायिक वीज ग्राहकांची संख्या १६ हजार ५०० एवढी आहे़ भूमिगत वाहिनीच्या कामाचा शुभारंभ आज झाला़ विजेच्या संदर्भातील तालुक्याचे प्रश्न बावनकुळे सोडवित आहेत़ (प्रतिनिधी)