नशीब बलवत्तर म्हणून ऊस तोडणी मजुराचा चिमुरडा किरण बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 05:18 PM2020-10-30T17:18:39+5:302020-10-30T17:27:06+5:30
जळगाव जिल्ह्यातील वनकुटे (ता.एरंडोल) येथील ऊस तोडणी मजूर सुरेश ठाकरे यांचा मुलगा किरण (वय ८) हा ट्रॅक्टरमधून झोपेत रस्त्यावर पडला. ही घटना नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर मढेवडगाव शिवारातील फरकांडे वस्तीजवळ गुरुवारी रात्री घडली. जखमी अवस्थेतील किरणला परिसरातील नागरिकांनी मायेचा आधार देऊन शुक्रवारी सकाळी त्याच्या आई-वडीलांच्या स्वाधीन केले.
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : जळगाव जिल्ह्यातील वनकुटे (ता.एरंडोल) येथील ऊस तोडणी मजूर सुरेश ठाकरे यांचा मुलगा किरण (वय ८) हा ट्रॅक्टरमधून झोपेत रस्त्यावर पडला. ही घटना नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर मढेवडगाव शिवारातील फरकांडे वस्तीजवळ गुरुवारी रात्री घडली. जखमी अवस्थेतील किरणला परिसरातील नागरिकांनी मायेचा आधार देऊन शुक्रवारी सकाळी त्याच्या आई-वडीलांच्या स्वाधीन केले.
हे ऊस तोडणी मजुर ट्रॅक्टरमधून माळेगाव (ता.बारामती) कारखान्यावर चालले होते. मढेवडगाव शिवारात किरण हा ट्रॅक्टरमधून रस्त्यावर पडला. मुलगा ट्रॅक्टरमधून पडला हे कोणालाही समजले नाही. रात्रीच्या अंधारामध्ये तो चिमुरडा घाबरलेल्या अवस्थेत रात्री किरणने आसरा मिळण्यासाठी सखाराम गायकवाड यांच्या घराचे दार वाजविले. रात्रीची वेळ असल्याने गायकवाड कुटुंबही चोर समजून घाबरून गेले. त्यांनी मदतीसाठी शेजारीच राहणाºया फरकांडे कुटुंबाला फोन करून चोर आलेत अशी माहिती दिली.
फरकांडे कुटुंबातील आठ-दहा व्यक्ती मदतीसाठी गायकवाड कुटुंबाच्या घरी आले. परंतु वस्तुस्थिती पाहिली तर एक लहान मुलगा घराच्या दारामध्ये रक्तबंबाळ अवस्थेमध्ये दिसला. सर्वांनी त्या मुलाची विचारपूस केली असता ही घटना त्यांच्या लक्षात आली. त्यांनी त्या मुलाला उपचारासाठी गावातील दवाखान्यामध्ये आणले. त्याच्यावरती उपचार केले. भिमराव फरकांडे यांनी किरणला पुन्हा आपल्या घरी नेले त्याला मायेचा आधार दिला.
शुक्रवारी सकाळी ही घटना सोशल मीडियावर टाकली. नागवडे कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे यांनी शेजारील काही कारखान्यातील शेतकी अधिकाºयांना या प्रकरणाची माहिती दिली. हनुमंत झिटे यांनी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील पोलीस स्टेशनशी संपर्क केला. ट्रॅक्टरमध्ये आपला मुलगा नाही ही बाब बºयाच अंतरावर गेल्यानंतर त्याच्या वडिलांच्या लक्षात आली. त्यावेळी ट्रॅक्टर चालक पुन्हा नगरच्या दिशेने आपला ट्रॅक्टर घेऊन गेले. किरणचा शोध लागला नाही. मग तो ट्रॅक्टर पुन्हा नगरवरून बारामतीच्या दिशेने येत असताना मढेवडगाव या ठिकाणी एका दुकानावरती थांबला.
ऊसतोड मजुरांचा ट्रॅक्टर पाहून दुकानदाराने कोणाचा मुलगा हरवला आहे का? चौकशी केली असता तो मुलगा त्यांच्याच ट्रॅक्टरमधून पडला व त्याचे कुटुंब ट्रॅक्टरमध्ये आहे. हे मढेवडगाव ग्रामस्थांना समजले. किरणला त्याच्या आई वडीलांच्या स्वाधीन केले. चिमुरड्या किरणला पाहून त्यांनी आनंदाचा हंबरडाच फोडला.