प्रभावी लसीकरणामुळे यंदा लम्पी आटोक्यात, सध्या केवळ ८२६ बाधीत

By चंद्रकांत शेळके | Published: September 26, 2023 06:35 PM2023-09-26T18:35:35+5:302023-09-26T18:36:41+5:30

सध्या जिल्ह्यात केवळ ८२६ बाधीत जनावरांची संख्या आहे.

Lumpy is under control this year due to effective vaccination, currently only 826 cases | प्रभावी लसीकरणामुळे यंदा लम्पी आटोक्यात, सध्या केवळ ८२६ बाधीत

प्रभावी लसीकरणामुळे यंदा लम्पी आटोक्यात, सध्या केवळ ८२६ बाधीत

अहमदनगर : जिल्ह्यात लम्पी साथरोगाची लागण आटोक्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात केवळ ८२६ बाधीत जनावरांची संख्या आहे. मागील वर्षी हाच आकडा ५० हजारांपर्यंत गेला होता. तरीही पावसाळ्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आहेत.

मागील वर्षी राज्यात ॲागस्ट २०२२ पासून जनावरांमध्ये लंपी साथरोगाचा कहर पहायला मिळाला. ॲागस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत मोठ्या संख्येने बाधित जनावरांची संख्या वाढली. डिसेंबरपर्यंत बाधित जनावरांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेला होता. दरम्यान जनावरे मृत्यू होण्याचे प्रमाणही खूप होते. मागील वर्षीच्या लंपी लाटेत ४ हजारांहून अधिक जनावरे दगावली.

दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने मोहीम राबवून दोन महिन्यात १०० टक्के लसीकरण केले. याशिवाय आवश्यक तेथे तातडीने उपचार, गोठा स्वच्छता, धूर फवारणी आदी उपाययोजना केल्याने डिसेंबरअखेरपर्यंत साथ आटोक्यात आली होती. पुढे ही संख्या कमी होत अगदी दोन आकड्यांवर आली.
दरम्यान, जुलै २०२३ पासून लंपीच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले. प्रारंभी आठवड्याला १०० ते २०० बाधित जनावरांची संख्या ॲागस्टमध्ये आठवड्याला ६०० पर्यंत गेली. परंतु पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना केल्या. जन्मलेल्या वासरांचेही लसीकरण केल्याने लंपी आटोक्यात आला. यंदा जुलैपासून एकूण ४ हजार ६७८ जनावरे बाधित झाली. त्यातील ३ हजार ५८५ जनावरे उपचाराने बरी झाली. सध्या केवळ ८२६ जनावरे बाधित (ॲक्टिव्ह) आहेत.
 
सध्या लम्पी आटोक्यात असला तरी पावसाळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी. पावसाळ्यात गोठ्यात कीटक, माशा वाढतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक फवारणी करून गोठ्यात स्वच्छता ठेवावी. लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुसंवर्धन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. दशरथ दिघे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
 
यंदा मरतूक कमी
मागील वर्षी बाधीत जनावरांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेल्याने ४ हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू चार महिन्यात झाला होता. यंदा मात्र गेल्या तीन महिन्यात केवळ २६७ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
 
१४ लाख जनावरांचे लसीकरण
जिल्ह्यात सर्व म्हणजे १४ लाख जनावरांचे लसीकरण पशुसंंवर्धन विभागाने पूर्ण केले. त्यामुळे यंदा लंपीचा प्रादुर्भाव आटोक्यात राहिला. जन्मलेल्या वासरांचे लसीकरणही तातडीने करण्यात येत आहे.
 
आठवडे बाजार अजून बंदच
लम्पी साथ आटोक्यात असली तरी अजून प्रादुर्भाव आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार, तसेच खरेदी-विक्री बंद करण्यात आलेली आहे. अद्याप एकही बाजार सुरू झालेला नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

Web Title: Lumpy is under control this year due to effective vaccination, currently only 826 cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.