माची डोंगराला १६ कि़मी़ लांब भेगा
By Admin | Published: August 9, 2016 11:59 PM2016-08-09T23:59:04+5:302016-08-10T00:25:07+5:30
अकोले : माची डोंगराला १६ किलोमीटर लांब मोठमोठ्या भेगा पडल्याने आंबित या आदिवासी खेड्यातील लोक जीव मुठीत घेऊन राहात आहेत़ गावकऱ्यांनी येथे न राहाता
अकोले : माची डोंगराला १६ किलोमीटर लांब मोठमोठ्या भेगा पडल्याने आंबित या आदिवासी खेड्यातील लोक जीव मुठीत घेऊन राहात आहेत़ गावकऱ्यांनी येथे न राहाता, प्रशासनाने सोय केलेल्या ठिकाणी सुरक्षित रहावे, तसेच परिसरातील भूस्खलनाची भू विज्ञान विभागाकडून तपासणी करुन गरज पडल्यास संपूर्ण गावाचे सुरक्षित पुनर्वसन करु, असा दिलासा देत आंबित गावात झालेल्या भूस्खलनाची पाहणी पालकमंत्री राम शिंदे यांनी केली.
मंगळवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी अंगावर घेत मंत्री शिंदे यांचा ताफा दुर्गम आंबित या आदिवासी गावात पोहचला. गावातील ८३ कुटुंबातील १११ पुरुष व ९२ स्त्रियांचे शिरपुंजे येथील शासकीय आश्रमशाळेच्या इमारतीत तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. गावकरी दिवसा गावात, शेतात जातात आणि रात्री आश्रमशाळेत येतात. पालकमंत्री शिंदे यांनी गावात व माची डोंगरावर जावून परिस्थितीचा आढावा घेतला.
वृध्द गावकऱ्यांशी संवाद साधला. सरकार संपूर्ण मदत करेल, असे आश्वासित केले. रस्त्याला पडलेल्या चार पाच फूट रुंदीच्या भेगांची पाहणी केली. डोंगराच्या भेगा दिवसागणिक मोठ्या होत चालल्याची चिंता गावकऱ्यांनी बोलून दाखविली.
१३४ घरांची पडझड झाली असून त्याचे सार्वजनिक बांधकामकडून मूल्यांकन आल्यावर तातडीने मदत देवू, असे स्पष्ट केले. पाळीव जनावरे मृत्यूमुखी पडलेत त्यापैकी २२७ जनावरांचे शवविच्छेदन अहवाल मिळाले, २२७ अहवाल बाकी आहेत, सरकारने २१ लाख रुपये मदत दिली असून आणखी मदत दिली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. गावातील वृध्द किसन आमृता कोंडार, वृध्दा मैनाबाई साबळे यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच शिरपुंजे आश्रमशाळेत स्थलांतरीत झालेल्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
यावेळी आदिवासी नेते अशोक भांगरे, जालिंदर वाकचौरे, माजी खा़ भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. किरण लहामटे, दिलीप भांगरे, सिताराम भांगरे, मच्छिंद्र धुमाळ, प्रदिप हासे, वसंत मनकर, सोनाली धुमाळ, रमेश राक्षे, भाऊसाहेब आभाळे, जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे, प्रांताधिकारी संदिप निचित, तालुका कृषी अधिकारी माधव हासे, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी अे.पी.आहिरे, प्रभारी तहसिलदार जगदिश गाडे, गटविकास अधिकारी विजय आहिरे, वनपरिक्षेत्रपाल बी.जी.निमसे यांच्यासह आंबीत गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)