महिलेवर अत्याचार करणारा संगमनेर तालुक्यातील मांत्रिक पोलीस कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 09:37 PM2021-05-11T21:37:58+5:302021-05-11T21:38:31+5:30

अंगातील भूतबाधा काढण्याच्या बहाण्याने मांत्रिकाने एका ४५ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यात घडला होता. या मांत्रिकाला पोलिसांनी अटक करीत मंगळवारी (दि. ११) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला शुक्रवार (दि. १४) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Magician in Sangamner taluka in police custody for abusing woman | महिलेवर अत्याचार करणारा संगमनेर तालुक्यातील मांत्रिक पोलीस कोठडीत

महिलेवर अत्याचार करणारा संगमनेर तालुक्यातील मांत्रिक पोलीस कोठडीत

संगमनेर : अंगातील भूतबाधा काढण्याच्या बहाण्याने मांत्रिकाने एका ४५ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यात घडला होता. या मांत्रिकाला पोलिसांनी अटक करीत मंगळवारी (दि. ११) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला शुक्रवार (दि. १४) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने सोमवारी (दि.१०) संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिला ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील रहिवासी आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावित्रा बाबूराव गडाख (५५, रा. पारेगाव बुद्रुक, ता. संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला अनेक दिवसांपासून चक्कर येणे, अशक्तपणा हा त्रास जाणवत असल्याने त्या दवाखान्यात उपचार घेत होत्या. मात्र, गुण येत नसल्याने भावाच्या सांगण्यावरून त्या पतीसह सावित्रा गडाख य‍ा मांत्रिकाकडे गेल्या होत्या. भूतबाधा झाली असून ती काढावी लागेल, असे मांत्रिकाने त्यांना सांगितले.

जेव्हा जेव्हा त्रास व्हायचा तेव्हा त्या पतीसह मांत्रिकाकडे जायच्या. त्यावेळी उदी व अंगारा पाण्यातून घेण्यास तो सांगायचा. तसेच येताना मद्याची बाटली, विडीचा बंडल व सोबत दोनशे रुपये घेऊन येण्यास सांगत असे. २३ एप्रिलला या सर्व वस्तू घेऊन महिला तिचा पती व मुलगा असे तिघे जण दुचाकीने मांत्रिकाकडे वस्तीवरील पठारावरील पोल्ट्री फार्मवर रात्री आठला पोहोचले होते. मध्यरात्री एक वाजता मांत्रिकाने या महिलेस तिच्या इच्छेविरुद्ध मद्य प्राशन करण्यास सांगितले व नंतर शेतात नेत तिच्यावर अत्याचार केले होते. पोलिसांनी पीडित महिलेची फिर्याद दाखल केली असून मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला सोमवारी ताब्यात घेत अटक केली.

फिर्याद देण्याकरिता पुढे यावे

सावित्रा गडाख याच्याकडे चौकशी केली असता त्याने भूतबाधा काढण्याच्या उद्देशाने अनेक महिलांवर अत्याचार केला आहे. तरी ज्या महिलांवर अत्याचार झाला आहे. त्यांनी फिर्याद देण्याकरिता पुढे यावे. असे आवाहन तालुका पोलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी केले आहे. पवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Magician in Sangamner taluka in police custody for abusing woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.