राधाकृष्ण विखेंच्या प्रवेशाने नगर जिल्ह्यातील युतीचे जागावाटप बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 02:19 PM2019-08-21T14:19:16+5:302019-08-21T14:30:25+5:30
राधाकृष्ण विखेंनी भाजपात प्रवेश केला आहे. ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी ही निवडून येत असल्याने शिर्डी मतदार संघ हा भाजपास सोडण्यात येऊ शकतो.
अहमदनगर - राधाकृष्ण विखेंनी भाजपात प्रवेश केला आहे. ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी ही निवडून येत असल्याने शिर्डी मतदार संघ हा भाजपास सोडण्यात येऊ शकतो. तसेच इतरही ठिकाणी विधानसभेसाठी नव्याने जागा वाटप होतील, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. यावेळी खा. सुजय विखे, माजी खा. दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, आ. शिवाजी कर्डीले, बाळासाहेब मुरकुटे, बबनराव पाचपुते आदीसह भाजपाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही नगर जिल्ह्यात २५ व २६ ऑगस्टला येत आहे. २५ तारखेला सकाळी शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असून लोणी येथे जाऊन राधाकृष्ण विखे यांची सांत्वन भेट घेणार आहेत. यानंतर अकोल्यात दुपारी २ वाजता महाजनादेश सभा होणार. ३ वाजता संगमनेर येथे मालपाणी लॉनमध्ये सभा होईल. राहुरी येथे सभा होऊन नगरला मार्गस्थ होणार आहे. सावेडी एमआयडीसी येथे भाजपाचे पदाधिकारी मुख्यमंत्री यांचे स्वागत करणार आहेत. शहरातून रॅली काढण्यात आल्यावर सायंकाळी सात वाजता गांधी मैदानात त्यांची सभा होणार आहे.
२५ तारखेला मुख्यमंत्री हे नगर विश्रामगृहावर मुक्कामाला थांबणार आहेत. २६ ला ते महाजनादेश यात्रा पाथर्डी कडे जाणार असून तेथे मार्केट यार्ड येथे ११.३० वाजता सभा होणार आहे. मात्र त्याआधी भिंगार, करंजी, तिसगाव येथे त्यांचे स्वागत होणार आहे. माणिकदौंडी मार्गे आष्टीला सभेनंतर जामखेड सभा होणार आहे, यानंतर बीड येथे सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. महाजनादेश यात्रा शिवसेनेच्याच मतदारसंघातून जात आहे, याकडे लक्ष वेधले असता राम शिंदे यांनी ही यात्रा महायुतीची आहे. त्यामुळे शिवसेना देखील यात सहभागी आहेच असं म्हटलं आहे.
तर भाजपा बारा जागा लढवेल...
नगर जिल्ह्यात महायुतीच्याच बारा जागा येतील. तसेच युती झाली नाही तर बाराही जागा लढवून भाजपा जिंकेल असे खासदार सुजय विखे यांनी सांगितले आहे.