सहकार उपनिबंधकाच्या कार्यालयातच महाआघाडीचा ठिय्या : नगर बाजार समितीवर कारवाईची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 03:21 PM2018-10-03T15:21:59+5:302018-10-03T15:22:12+5:30
नगर तालुका महाआघाडीने केलेल्या तक्रारीची चौकशी होवून दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. चौकशी अहवालात नगर बाजार समितीत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे,
केडगाव : नगर तालुका महाआघाडीने केलेल्या तक्रारीची चौकशी होवून दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. चौकशी अहवालात नगर बाजार समितीत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे, असे असताना जिल्हा उपनिबंधकांकडून बाजार समितीवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ महाआघाडीच्या वतीने डीडीआरच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, सभापती रामदास भोर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, पंचायत समिती सदस्य रविंद्र भापकर, संदीप गुंड, गोरख काळे, अमोल कदम यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषि उत्पन्न बाजार समितीने मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे गाळे उभारले आहेत. तसेच कर्मचा-यांचा पीएफ ही भरलेला नसल्याची तक्रार महाआघाडीने डीडीआरकडे केली होती. तक्रारीवरुन चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने अहवाल देवून दोन महिने झाले. बाजार समितीने गैरप्रकार केला असल्याचे सिद्ध झाले असताना डीडीआर यांनी कलम ४० अन्वये बाजार समितीला नोटिस देवून खुलासा मागविला आहे. थेट कारवाईचे अधिकार असताना बाजार समितीवर कारवाई केली जात नाही. बाजार समितीवर कारवाई झाल्याशिवाय ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य कार्ले यांनी सांगितले.
दरम्यान, बाजार समितीने काही प्रॉव्हिडंट फंड भरला असल्याचे सांगितले आहे. परंतु, तो कोणत्या खात्यात भरला आहे. हे डीडीआर यांनी दाखवावे. फंडच भरलेला नसल्यामुळे बाजार समितीवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाआघाडीकडून करण्यात आली आहे.
डिडिआर यांनी चौकशी करून त्याचे पत्र आम्हास दिले आहे. त्यात काही मार्गदर्शक सुचना आहेत. त्या सुचनांची बाजार समिती अमंलबजावणी करणार आहे. तरीही ठिय्या आंदोलन करण्याचा हेतू समजला नाही . - रेश्मा चोभे, उपसभापती, बाजार समिती
डिडिआर बाजार समितीमधील गैरव्यवहार पाठिशी घालत आहेत. त्यांच्यात मिलीभगत सुरू असल्याचा संशय आहे. यामुळेच चौकशी होऊनही कारवाई करण्यात व फौजदारी दाखल करण्यात टाळाटाळ होत आहे . - संदेश कार्ले, महाआघाडी