महाजेनको परीक्षा पेपर फुटी प्रकरण; नगर केंद्रातून रिजवानने पाठविली अर्जुनला प्रश्नपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:05 AM2017-11-15T11:05:18+5:302017-11-15T11:10:25+5:30
महावीज (महाजेनको) कंपनीच्या लिपिकपदासाठी झालेल्या परीक्षेत नगर केंद्रातून आॅनलाईन पेपर फोडणा-या उमेदवाराचे नाव समोर आले आहे. रिजवान शेख (रा. परसोडा ता. वैजापूर) याने मायक्रो स्पाय कॅमे-याच्या माध्यमातून कम्प्यूटर स्क्रिनवरील प्रश्नपत्रिका स्कॅन करून इमेलद्वारे औरंगाबाद येथे अर्जुन घुसिंगे याला पाठविली होती.
अहमदनगर : महावीज (महाजेनको) कंपनीच्या लिपिकपदासाठी झालेल्या परीक्षेत नगर केंद्रातून आॅनलाईन पेपर फोडणा-या उमेदवाराचे नाव समोर आले आहे. रिजवान शेख (रा. परसोडा ता. वैजापूर) याने मायक्रो स्पाय कॅमे-याच्या माध्यमातून कम्प्यूटर स्क्रिनवरील प्रश्नपत्रिका स्कॅन करून इमेलद्वारे औरंगाबाद येथे अर्जुन घुसिंगे याला पाठविली होती.
औरंगाबादच्या पोलीस पथकाने सोमवारी रात्री नगर येथे येऊन रिजवान याचा शोध घेतला़ नगर शहरात मात्र तो सापडला नाही. पोलिसांनी त्याच्या परसोडा या गावी जाऊन शोध घेतला तेव्हा त्याच्या घरात एक लॅपटॉप आढळून आला. पेपर फोडण्याच्या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार घुसिंगे हा फरार आहे. तो पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर नगर केंद्र्रासह इतर ठिकाणी त्याने बसविलेल्या उमेदवारांची माहिती समोर येणार आहे. सोमवारी रात्री मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक हारूण शेख यांच्यासह कॉन्स्टेबल अस्लम शेख, विजय चौधरी, कैलास काकड व प्रकाश सोनवणे यांनी नगर शहरात रिजवान याचा शोध घेतला.
शासनाच्या महाजेनको कंपनीने लिपिकपदासाठी रविवारी (दि़१२) राज्यात विविध जिल्ह्यात आॅनलाईन परीक्षा घेतली़ नगर शहरातील न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात परीक्षा केंद्र होते. लिपिकपदासाठी अर्ज दाखल करणा-या उमेदवारांना या परीक्षेत मेरीटमध्ये उत्तीर्ण करण्याची जबाबदारी औरंगाबाद येथील अर्जुन घुसिंगे याने घेतली होती. यासाठी त्याने उमेदवारांकडून प्रत्येकी सात ते आठ लाख रुपयांचा सौदा केला होता. यातील ४० टक्के रक्कम अॅडव्हान्स तर उर्वरित रक्कम परीक्षेच्या निकालानंतर देणे, असा हा व्यवहार होता. घुसिंगे याच्या सांगण्यावरून औरंगाबाद जिल्ह्यातील उमेदवारांनी अहमदनगर येथील परीक्षा केंद्र निवडले होते.
उमेदवारांच्या मनात शंका
महावितरण कंपनीच्या अंतर्गत असलेल्या महाजेनकोच्या लिपिकपदासाठी नगर जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेत मात्र आॅनलाईन पेपर फुटीचे प्रकरण समोर आल्याने अभ्यास करून परीक्षा देणा-या उमेदवारांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. सध्या जिल्हा बँकेच्या भरतीचे प्रकरण सुरू असतानाच महाजेनकोच्या परीक्षेचेही हे प्रकरण समोर आले आहे.