"माझं ग्रहमान ठीक नाही"; सुजय विखेंच्या विधानावर जयश्री थोरात म्हणाल्या, "तुमची रेसिपी चुकली"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 08:38 PM2024-11-11T20:38:20+5:302024-11-11T20:55:13+5:30
माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय अशी भावना सुजय विखेंनी व्यक्त केली होती.
Jashree Thorat on Sujay Vikhe Patil : गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु आहे. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वाद आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला आहे. बाळासाहेब थोरात हे संगमनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र या प्रचारादरम्यान, सुजय विखे पाटील यांच्या एका मेळाव्यात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याने मोठा वाद उफळला होता. त्याबद्दल बोलताना सुजय विखे यांनी माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय अशी भावना व्यक्त केली होती. त्यावर आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी भाष्य केलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सुजय विखे पाटील हे संगमनेर मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. सुजय विखे यांच्या सभेदरम्यान भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. याप्रकरणी देशमुख यांना अटक देखील झाली. त्यानंतर सुजय विखे यांनी एका सभेत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
माझं काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय, असं सुजय विखेंनी म्हटलं होतं. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुजय विखे यांच्या या वक्तव्यावर जयश्री थोरात यांनी भाष्य केलं आहे. "संगमनेर तालुक्यात सुजय विखेंनी चार सभा घेतल्या. चार सभांमध्ये त्यांना वाटत असेल की त्यांचं पातेलं शिजलं तर तो त्यांच्या गैरसमज म्हटला पाहिजे. चार सभांमध्ये पातेलं शिजलं असं म्हणता येत नाही. तो त्यांचा गैरसमज आहे. त्यांनी संगमनेर मध्ये घेतलेल्या सभा या वेगळ्या होत्या. आमच्या संगमनेर तालुक्याला अशा राट भाषेची सवय नाही. त्यांची रेसिपी ठिकाण आणि त्यांची वेळ पण चुकली. पातेल्यातलं शिजलं जरी असेल तरी त्याची चव चांगली नसेल," असं जयश्री थोरात यांनी म्हटलं.
काय म्हणाले सुजय विखे पाटील?
"लोकसभा निवडणुकीत मार्चपर्यंत चांगलं वातावरण असताना नंतर अचानक काय झालं माहिती नाही. माझा पराभव झाला. माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय. संगमनेरमध्ये देखील आपल्या सभांना गर्दी पाहून सर्वांना वाटलं की मी आमदार होणार. तशी चर्चा सुरू झाली. मात्र वसंत देशमुखांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली. त्यामुळे माझं काय ग्रहमान लोकांसाठी ठीक दिसत नाही. मला बोलवू नका. तुमचं चाललंय चालूद्या. मी योग्य त्या गोष्टी वेळेवर करेन," असे सुजय विखेंनी म्हटलं होतं.