"घराबाहेर पडू देणार नाही"; अश्लाघ्य वक्तव्यावर जयश्री थोरातांची कारवाईची मागणी, म्हणाल्या, "मी असं काय केलं..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 11:15 AM2024-10-26T11:15:59+5:302024-10-26T11:16:39+5:30
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी सुजय विखे आणि वसंतराव देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
Jayashree Thorat : संगमनेरच्या धांदरफळ बुद्रूक येथे युवा संकल्प मेळाव्यात माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांची सभा पार पडली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेल्या वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केली. सुजय विखे हे मंचावर असतानाच वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केले. देशमुखांच्या या विधानानंतर संगमनेर तालुक्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. सुजय विखे आणि वसंतराव देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे, ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांना शिक्षा मिळायला हवी असं जयश्री थोरात यांनी म्हटलं आहे.
धांदरफळ येथील सभेत वसंतराव देशमुख यांनी अश्लाघ्य भाषेत जयश्री थोरात यांच्याबाबत भाष्य केलं. भाषणानंतर सभेच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुजय विखे बॅनर फाडत आपला निषेध नोंदवला. तर सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. त्यानंतर जयश्री विखे यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी कारवाईसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. त्यानंतर बोलताना जयश्री थोरात यांनी सुजय विखे आणि वसंतराव देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली.
"हे वक्तव्य कोणालाही शोभणारं नाही. अशी वक्तव्य करणारी लोकं असतील तर महिलांनी राजकारणात का यायचं. मी असं काय वाईट करत होते. मी माझ्या वडिलांसाठी मैदानात होते. असं काय वाईट केलं की एवढं वाईट माझ्याबद्दल बोललं गेलं. ते वक्यव्य त्यांच्या वयाला शोभणारं तरी आहे का. विरोधकाला पण एक पातळी असते. एवढ्या खालच्या पातळीला जाऊन तुमच्या मुलीच्या, नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलता हे शोभणारं नाही. माझ्या आजोबांनी त्यांना सरळ करण्याचे काम केलं होतं. अशा माणसाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवताना त्यांनी काय विचार केला होता हे समजत नाही," असं जयश्री थोरात म्हणाल्या.
"सुजय विखेंनी मागच्या काही दिवसांमध्ये केलेली भाषणं तपासून घेतली पाहिजेत. त्यांनी सुद्धा पातळीसोडून माझ्याविरुद्ध भाषणं केली आहेत. तेसुद्धा युवा नेते आहेत. त्यामुळे त्यांनीसुद्धा पातळी जपली पाहिजे," अशीही टीका जयश्री थोरातांनी केली.
"आठ तास पोलीस ठाण्यात आम्ही बसून होतो. पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबाव आहे. ज्या व्यक्तीने हे विधान केलं आहे तो फरार आहे. त्याच्यावर कारवाई का झालेली नाही. ज्यांनी हे वक्तव्य केले आहे त्यांना शिक्षा मिळायला हवं. मी या विरुद्ध लढणार आहे. आम्ही पातळी सोडून बोलून नाहीत तर आमच्यावर टीका केली जाते," असेही जयश्री थोरात म्हणाल्या.