"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 10:05 AM2024-10-26T10:05:05+5:302024-10-26T10:26:36+5:30
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या कन्येबाबात माजी खासदार सुजय विखेंच्या सभेत खालच्या पातळीवर टीका करण्यात आलीय.
Sujay Vikhe : संगमनेरमध्ये भाजपच्या एका जेष्ठ नेत्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. संगमनेरच्या धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आयोजित केलेल्या युवा संकल्प मेळाव्यात विखे समर्थक असलेल्या वसंतराव देशमुख यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं.वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचे संगमनेरमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. जयश्री थोरातांबाबत वसंतराव देशमुखांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर सुजय विखेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुजय विखे यांच्या भाषणापूर्वी देशमुख यांनी हे वक्तव्य केले. या सभेनंतर धांदरफळ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध केला. याशिवाय अकोले नाका परिसरात लावण्यात आलेले विखे यांचे बॅनरही फाडण्यात आले. तसेच विखे समर्थकांच्या काही वाहनांचीही तोडफोड झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांना सुजय विखे, वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात तणाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे सुजय विखे यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
"महायुतीच्या मेळाव्यामध्ये वसंतराव देशमुख यांनी स्थानिक नेत्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. ते टीका करत असताना मी त्यांना दोनदा थांबवण्याचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने ते थांबत नसल्याने मी माझं भाषण लिहायला सुरुवात केली. ते स्टेजवर काय बोलले हे माझ्या लक्षात आलं नाही. माझं भाषण संपल्यानंतर गोंधळ सुरू झाला आणि मी तेव्हा एकाला विचारलं की काय नेमकं झालं. मी तिथे वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचे निषेध नोंदवायच्या आधीच सगळा गोंधळ उडाला. महायुतीच्या कुठल्याही नेत्याचा त्या वक्तव्याशी संबंध नाही. मी त्या वक्तव्याचा निषेध करतो. कुठलाही राजकीय नेता कुठल्याही राजकीय पक्षाचा असो असे वक्तव्य करत असेल तर त्याला पक्षामध्ये ठेवले जाणार नाही महायतीमध्ये ठेवले जाणार नाही," असं सुजय विखे पाटील म्हणाले.
"वसंतराव देशमुख यापूर्वी अनेक वादांमुळे वादांमध्ये अडकलेले आहेत. दुर्दैवाने मी स्टेजच्या खाली उतरल्यावर त्यांचे भाषण सुरू झालं. भाषण सुरू झाल्यानंतर मी दोन कार्यकर्त्यांना त्यांना खाली बसवण्यासाठी सांगितलं कारण ते आक्षेपार्ह वक्तव्य करतील. ते ऐकत नसल्याने मी म्हटलं की पाच मिनिटं त्यांना बोलू द्या. त्यानंतर मी माझ्या भाषणाची तयारी करायला लागलो. त्यानंतर माझं भाषण झालं आणि मग गोंधळाला सुरुवात झाली तेवढ्या वेळात काय घडलं मला समजलं नाही. या वक्तव्याचा महायुतीशी काही संबंध नाही आम्ही त्याचा निषेध करतो," असेही सुजय विखे म्हणाले.
"या सगळ्या गोंधळात आमच्या सभेला आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्या जाण्या झाल्या गाड्यांमध्ये असलेल्या महिलांना खाली उतरवण्यात आलं आणि त्या फोडण्यात आल्या. माझा एवढचं म्हणणं आहे की वसंतराव देशमुख यांच्यावर पोलिसांनी योग्य ते कलम लावून कारवाई करावी त्यामध्ये आम्ही कधीही मध्ये येणार नाही. पण ज्या लोकांनी आमच्या गाड्या जायला सभेला आलेल्या महिलांचा खाली उतरवलं त्यांच्यावरही योग्य कारवाई व्हावी," असंही आवाहन सुजय विखे यांनी केलं.