पुन्हा महायुतीचेच सरकार, खोट्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही: रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2024 01:46 PM2024-11-13T13:46:29+5:302024-11-13T13:47:09+5:30
कर्जत येथे मंगळवारी महायुतीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, कर्जत : महाराष्ट्रासह कर्जत-जामखेड मतदारसंघात रिपाई महायुती, एनडीए सोबत आहे. राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याचा विश्वास आम्हाला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने संविधान बदलण्याचा जो खोटा प्रचार केला होता, तो उघडा पडलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता आता पुन्हा या खोट्या प्रचारास बळी पडणार नाही, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
कर्जत येथे मंगळवारी महायुतीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आठवले म्हणाले, ज्याला संविधान मान्य नाही. त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही. संविधान बदलण्याची भाषा जी सुरू आहे ती केवळ सत्ता मिळविण्यासाठी केलेली धडपड आहे. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. म्हणून त्यांचा तोल सुटत असून, ते काहीही बेछूट आरोप महायुतीवर करत आहेत. २०२४ ला खोटा-नाटा प्रचार करून लोकांची दिशाभूल करीत विरोधीपक्ष पद मिळेल एवढ्या जागा त्यांनी मिळवल्या. खासदार राहुल गांधी हे भाजपबाबत संविधान बदलण्याची भाषा करतात, यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर करतात. भाजप विकासाचे राजकारण करीत असून, सर्व घटकांना न्याय देण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ करण्याची घोषणा लवकरच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षासाठी ठोस शब्द घेतला
महायुतीमध्ये तीन मोठे राजकीय पक्ष असल्याने रिपाइंला दोनच जागा मिळाल्या आहेत. मात्र, कोणत्याही नेत्यांनी अथवा कार्यकर्त्यांनी हवालदिल होऊ नये. सत्तेत मंत्रीपद यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच विविध महामंडळात रिपाईसाठी ठोस शब्द घेतला आहे. त्यामुळे सर्वांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आदेश पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे आठवले यांनी सांगितले.