महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर बाळासाहेब थोरातांवर महत्त्वाची जबाबदारी: सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2024 12:59 PM2024-11-19T12:59:46+5:302024-11-19T12:59:57+5:30
साकूर येथे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ सभा
लोकमत न्यूज नेटवर्क, घारगाव : आमदार बाळासाहेब थोरात राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या समन्वयाची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळली आहे. कोणताही प्रश्न आला की ते सर्वांना सोबत घेऊन तो सोडवतात. त्यांचा संगमनेर तालुका विकासाचे मॉडेल ठरला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी येणार आहे, असे सुतोवाच खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर येथे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. जयश्री थोरात, राजस्थानच्या माजी मंत्री अर्चना शर्मा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, बाजीराव खेमनर, इंद्रजीत खेमनर, उद्धवसेनेचे अमर कातारी, संजय फड, दिलीप साळगट, अशोक सातपुते, मीरा शेटे, अॅड. अशोक हजारे, सचिन खेमनर, सुधाकर जोशी, जयराम ढेरंगे, सुनंदा भागवत आदी उपस्थित होते.
जयश्री थोरात आदर्श कन्या
आमदार थोरात यांच्या नेतृत्वाची राज्याला गरज आहे आणि संगमनेरकर नागरिकांचे स्वप्न पूर्ण व्हावे, हीच माझी सुद्धा इच्छा आहे. आमदार थोरात यांना विक्रमी मतांनी विजयी करा. डॉ. जयश्री थोरात आदर्श कन्या आहेत, असेही खासदार सुळे म्हणाल्या.
संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून, प्रत्येक गावात, वाड्यावस्त्यांवर आपण विकासाच्या योजना राबविल्या आहेत. तालुक्याच्या पठार भागातील जनतेने आपल्यावर कायम प्रेम केले. आपल्या तालुक्यात चांगले वातावरण आहे. मात्र, हे खराब करण्यासाठी काही मंडळींकडून काम केले जात आहे. राहाता तालुक्यातील दहशत ते इकडे आणत आहेत. पोलिस प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा. नाहीतर आम्हाला दुरुस्ती करावी लागेल. सरकारचा कोणताही धाक राहिला नसून पालकमंत्री दडपशाहीला प्रोत्साहन देत आहेत. - बाळासाहेब थोरात, आमदार