आयटी पार्कला बाळासाहेब थोरातांचा खोडा: राधाकृष्ण विखे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2024 12:36 PM2024-11-17T12:36:34+5:302024-11-17T12:38:01+5:30
अस्तगाव येथील सभेत केला आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, राहाता : शिर्डी येथे आयटी पार्क उभारण्यासाठी श्री साईबाबा संस्थानला शेती महामंडळाची जमीन मंजूर झाल्याचा ठराव माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाणीवपूर्वक रद्द करून, आयटी पार्कच्या उभारणीत खोडा घातला, असा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
निवडणूक प्रचारार्थ अस्तगाव येथे झालेल्या सभेत मंत्री विखे-पाटील म्हणाले की, आयटी पार्कवर भाष्य करणाऱ्या शरद पवार यांनी याची जरा माहिती घेऊन आपल्या शेजारी बसणाऱ्या संगमनेरच्या नेत्याला ते जाब विचारणार का? असा प्रश्न उपस्थित केला. शेती महामंडळाची जमीन संस्थानला देण्याचा ठराव तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ७ जुलै २०१७ रोजी झाला होता. त्यामध्ये १३१ एकर जमीन देण्याचा निर्णय केला होता. मात्र आघाडी सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी २३ फेब्रुवारी २०२१ रोजी घेतलेल्या बैठकीत या १३१ जागेचा मंजूर झालेला ठराव रद्द केला. त्यामुळे शिर्डी येथील आयटी पार्कच्या उभारणीत कोणी खोडा घातला याची माहिती आता पवार साहेबांनी घ्यावी, असे थेट आव्हान विखे-पाटील यांनी दिले.
निळवंडे धरणाच्या बाबतीतही मुख्यमंत्री असून सुध्दा निळवंडे धरणाच्या बाबतीत पवारांची हीच भूमिका राहिली. जिल्ह्यात येवून चार चार वेळा भूमिपूजन केले. पण धरणाच्या कामाला निधीची तरतुद तुम्ही करु शकला नाहीत. इकडचा निधी कमी करुन, पुणे जिल्ह्यातील धरणांना तुम्ही किती निधी दिला? असा प्रश्न उपस्थित करुन, केवळ खासदार साहेबांना बदनाम करण्याचे हे कटकारस्थान होते. असे त्यांनी सांगितले.