उसाबाबत नेवाशातील शेतकऱ्यांनी चिंता करू नये: श्रीकांत शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2024 09:29 AM2024-11-15T09:29:37+5:302024-11-15T09:29:48+5:30
येथील दहशत मोडीत काढण्यासाठी विठ्ठलराव लंघे यांना विजयी करा, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घोडेगाव येथील जाहीर सभेत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, घोडेगाव: ऊस उत्पादकांना ऊस तोडणीबाबत कोणी धमकावत असेल, दहशत करत असेल तर यापुढे शेतकऱ्यांनी घाबरू नये. शेतकऱ्यांनी ऊस तोडीबाबत चिंताही करू नये. लवकरच प्रभाकर शिंदे व विजय शिवतारे यांचे दोन साखर कारखाने सुरू होत आहेत. येथील दहशत मोडीत काढण्यासाठी विठ्ठलराव लंघे यांना विजयी करा, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घोडेगाव येथील जाहीर सभेत केले.
यावेळी व्यासपीठावर माजी खासदार सदाशिव लोखंडे, भाजपचे प्रवक्ते नितीन दिनकर, राष्ट्रवादीचे अब्दुल शेख, किसनराव गडाख, प्रभाकर शिंदे, अरुण मुंडे, सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे, अंकुश काळे, माऊली पेचे, भगवानराव गंगावणे, भाऊसाहेब वाघ, संजय पवार, बाळासाहेब पवार, डॉ. कोलते, शेतकरी संघटनेचे अशोकराव काळे, प्रताप चिंधे, दत्तात्रय खेमनर, अशोकराव पटारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले, विद्यमान आमदारांनी तालुक्यात कुठल्याही पायाभूत सुविधा, कुठलाही मोठा प्रकल्प आणला नाही. येथील एमआयडीसीमध्ये आपल्याच लोकांना प्लॉट दिले. त्यामुळे बाहेरील अनेक कंपन्या या भागात आल्या नाहीत. आमदारांच्या खासगी बँका असून, या बँकेमार्फत येथील शेतकऱ्यांना आगाऊ व्याजदर आकारून लुटण्याचे काम सुरू आहे. शनिशिंगणापूरसारख्या देवस्थानमध्ये भ्रष्टाचार होतो आहे.
नेवासा ही संतांची पावन भूमी आहे. या पावन भूमीमध्ये असलेली दहशत मोडीत काढायची आहे. महायुतीचे सरकार हे लोकांचे सरकार आहे. लोकांसाठी काम करणारे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली. राज्यात एकही घर शिल्लक राहिले नाही की ज्या घरात लाडक्या बहिणीला या योजनेचा फायदा मिळाला नाही. म्हणूनच या मतदारसंघात परिवर्तन घडवून आणा.
तालुक्याच्या विकासासाठी जी मदत लागेल ती संपूर्ण मदत मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाहीत, असे शिंदे म्हणाले. यावेळी अनेक गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये जाहीर प्रवेश केला.
ही माझी शेवटची निवडणूक : लंघे
गेल्या पंचवीस वर्षापासून मी प्रामाणिकपणे समाजकारण आणि राजकारण करत आहेत. परंतु, दोन वेळेस मला थोड्याफार मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. यावेळी मला सर्वांच्या आशीर्वादाने उमेदवारीची संधी मिळाली आहे. आता कदाचित माझी ही शेवटची निवडणूक असेल. त्यामुळे मतदारांनी या निवडणुकीत मला संधी द्यावी, अशी भावनिक साद लंघे यांनी मतदारांना घातली.