अपक्ष उमेदवाराचे कुटुंबीयांसह संगमनेरातून केले अपहरण; गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2024 11:03 AM2024-11-05T11:03:32+5:302024-11-05T11:04:57+5:30
नाशिकला जात असताना घडला प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले छत्रपती संभाजीनगर येथील राजू धर्माजी शिंदे यांच्यासह त्यांची पत्नी, बहीण, मेव्हणे अशा चौघांचे रविवारी (दि. ३) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील समनापूर येथून अपहरण करण्यात आले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तो शिर्डी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
अपक्ष उमेदवार राजू धर्माजी शिंदे, त्यांच्या पत्नी चंद्रकलाबाई राजू शिंदे, बहीण ताराबाई किशोर तुपे व त्यांचे मेव्हणे किशोर तुपे अशी अपहरण झालेल्या चौघांची नावे आहेत. मंगेश काशिनाथ जाधव (वय २९, रा. करोडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. विधानसभा निवडणुकीत राजू धर्माजी शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. १ नोव्हेंबरला फिर्यादी जाधव यांच्यासह उमेदवार राजू धर्माजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी चंद्रकलाबाई शिंदे, बहीण ताराबाई व मेव्हणे किशोर तुपे, जाधव यांचा मित्र स्वप्निल भिकनराव शिरसाठ तसेच वाहनचालक सुहास बापू बागुल हे सर्वजण चारचाकी वाहनातून (एम. एच. ०४, जी. एच. ४०४१) शिर्डी येथे आले होते. सकाळी दर्शन करून ते दोन दिवस तेथील एका हॉटेलात थांबले होते. रविवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास हे सर्वजण नाशिकला जाण्यासाठी संगमनेर मार्गे निघाले होते. ते प्रवास करीत असताना शिर्डी येथूनच त्यांच्या वाहनाचा तीन चारचाकी वाहने पाठलाग करत होती. हे लक्षात आल्याने त्यांचा वाहनाचा चालक जलद गतीने वाहन चालवित होता.
'तू उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे की नाही'
दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ते संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारात आले, त्यावेळी अचानक त्यांच्या वाहनासमोर आलेल्या सात-आठ अनोळखी इसमांनी त्यांचे वाहन अडविले. तुम्ही येथेच गाडी थांबवून ठेवा असे त्यांना म्हणू लागले. त्यानंतर काही वेळातच तेथे काळ्या रंगाच्या चारचाकी वाहन (एम.एच. २०, जी.के. ९००४) आणि इतरही दोन चारचाकी वाहने येथून थांबली. त्या वाहनांतून ८-१० अनोळखी व्यक्ती खाली उतरून राजू धर्माजी शिंदे हे प्रवास करीत असलेल्या वाहनाजवळ आल्या. त्यांनी शिंदे यांना 'तू उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे की नाही' असे विचारले. त्यावेळी शिंदे त्यांना हो म्हणाले.
धमकावून वाहनात् बसवून पळवून नेले
आलेल्या व्यक्तींपैकी दोघे ओळखीचे होते. त्यांची नावे गोकूळ मलके (पूर्ण नाव माहीत नाही), रवी कावडे (दोघेही रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी धमकावून अपक्ष उमेदवार राजू धर्माजी शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी, बहीण व मेव्हणे यांना धमकावून आमच्या गाडीतून उतरवून त्यांनी आणलेल्या चारचाकी वाहनात त्या चौघांना बसवून पळवून नेले, असेही फिर्यादीत म्हटले आहे.