श्रीरामपुरात कानडेच महायुतीचे अधिकृत उमेदवार; विखे पाटील यांनी ठणकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2024 12:59 PM2024-11-09T12:59:50+5:302024-11-09T13:01:18+5:30
भाऊसाहेब कांबळे यांनी दगाफटका केला, त्यांना माफी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर :श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात आमदार लहू कानडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी दगाफटका केला. त्यांना आता माफी नाही, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रचार सभेत ठणकावून सांगितले.
गोंधवणी येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचाराची शुक्रवारी सुरुवात झाली. यावेळी विखे पाटील बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची सभेला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अरुण नाईक, उपसभापती अभिषेक खंडागळे, माजी जि.प. सदस्य शरद नवले, नितीन दिनकर, कैलास बोर्ड, अमृत धुमाळ, महंमद शेख, मुक्तार शाह आदी उपस्थित होते.
श्रीरामपुर मतदारसंघात कानडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना महायुतीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. यानंतर भाऊसाहेब कांबळे यांनी शिंदे सेनेकडून एबी फार्म घेऊन ते उमेदवारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर विखे पाटील म्हणाले, आमदार कानडे यांच्यासारख्या नेत्याला थोरात यांनी उमेदवारी डावलली. मात्र त्यातून कानडे हे महायुतीचे उमेदवार झाले ही चांगली गोष्ट घडली. त्यांना निवडून आणण्याची ग्वाही आपण येथे देत आहोत.
तटकरे म्हणाले, दिवंगत गोविंदराव आदिक यांच्या मतदारसंघातील उमेदवार राष्ट्रवादीला मिळाल्याचा आनंद झाला. राज्यात महायुतीचे सरकार येणार असून विखे पाटील हे कानडे यांना विजयी करतील. त्यांच्या मतदारसंघाला भरीव निधी देण्याची मी ग्वाही देतो. पश्चिमेचे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्याचे काम केवळ महायुतीचे सरकार पूर्ण करेल.
भाऊसाहेब कांबळेंना माफी नाही
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी विश्वासघात केला, अशी टीका विखे पाटील यांनी केली. अर्ज माघारीच्या वेळी ते नॉट रिचेबल झाले होते. त्यांनी वेळीच थांबावे, अन्यथा त्यांना माफी नाही. महायुतीचे अधिकृत उमेदवार कानडे हेच आहेत. कार्यकर्त्यांनी कोणतीही शंका बाळगू नये, असे ते म्हणाले.
सोळा हजार कोटींची गुंतवणूक आणणार
श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये साडे पाचशे कोटी रुपयांचा प्रकल्प आपण आणला. लवकरच येथे १६ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आणणार आहोत. त्यामुळे येथील विकासाला चालना मिळेल, असे विखे म्हणाले.