लहू कानडे यांचा अजित पवार गटात प्रवेश; काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 08:33 AM2024-10-29T08:33:00+5:302024-10-29T08:36:06+5:30

काँग्रेस पक्षाने प्रामाणिकता व निष्ठेचे मोल केले नाही. उमेदवारी नाकारणे अत्यंत वेदनादायी व विश्वासघातकी होते, अशी टीका कानडे यांनी केली.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 lahu kanade joins ncp ajit pawar group | लहू कानडे यांचा अजित पवार गटात प्रवेश; काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

लहू कानडे यांचा अजित पवार गटात प्रवेश; काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर : काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर आमदार लहू कानडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात सोमवारी प्रवेश केला. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी आपल्याला मिळाली असून, मंगळवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मंगळवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कानडे हे महायुतीतील मित्र पक्षाच्या समर्थकांसह अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी कानडे यांनी काँग्रेस पक्षाकडे आपला राजीनामा सादर केला. शनिवारी रात्री व रविवारी सकाळी मुंबईमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. आमदार कानडे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. 

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, अमृत धुमाळ, माजी नगरसेवक अशोक कानडे उपस्थित होते. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आमदार कानडे यांनी चर्चा केली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक व माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनाही पक्ष प्रवेशाची माहिती देण्यात आली. आदिक बंधूंनी कानडे यांच्या प्रवेशाचे स्वागत केले आहे. त्यांच्या समर्थकांनी श्रीरामपुरात फटाक्यांची आतषबाजी केली.

राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशावर आमदार कानडे यांची प्रतिक्रिया 'लोकमत'ने जाणून घेतली. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने प्रामाणिकता व निष्ठेचे मोल केले नाही. कोणतीही पूर्वकल्पना न देता ऐनवेळी काँग्रेसचे तिकीट नाकारले. ते अत्यंत वेदनादायी व विश्वासघातकी होते. मात्र, अशा अडचणीच्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी माझा सन्मान केला. अजित पवार यांना माझ्या विधानसभा कार्यकाळातील कामकाजाची पूर्णपणे माहिती होती. पवार यांनी राष्ट्रवादीचे निमंत्रण दिले. क्षणाचाही विलंब न करता आपण ते स्वीकारले. अजित पवार यांनी महायुतीतील भाजप, शिंदेसेनेतील श्रेष्ठींशी चर्चा केली. दिल्लीतील मोठ्या नेत्यांनाही याबाबत अवगत केले आणि आपला पक्षप्रवेश झाला, असे कानडे यांनी सांगितले.

महायुतीत दोघांना एबी फॉर्म ? 

मंगळवारी कानडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, त्यात सोमवारी संध्याकाळी पुन्हा नाट्य रंगले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समर्थकांना माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा अर्ज दाखल करण्याचे निरोप मिळाले आहेत. विखे- पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. कांबळे समर्थकांनी त्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्याचा दावा केला.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 lahu kanade joins ncp ajit pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.