नेवासाच्या विकासासाठी परिवर्तन घडवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2024 01:14 PM2024-11-12T13:14:05+5:302024-11-12T13:14:24+5:30
नेवासा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचारार्थ सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेवासा येथे सभा झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क, नेवासा : नेवासा तालुक्याच्या विकासासाठी परिवर्तन घडवा. महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांना विजयी करा. महायुतीचे सरकार येताच ज्ञानेश्वर सृष्टी आणि अहिल्यादेवी स्मारकाचे काम हाती घेतले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नेवासा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचारार्थ सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेवासा येथे सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, बाबूशेठ टायरवाले, राष्ट्रवादीचे युवानेते अब्दुल शेख, शिवसेना प्रवक्ते संजीव भोर, किसनराव गडाख, नितीन दिनकर, शिवसेनेचे प्रभाकर शिंदे, भाजपचे विधानसभा संयोजक सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे, अॅड. अशोक करडक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, नेवासा तालुका शिवसेना विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ, बाळासाहेब पवार, निरंजन डहाळे, सुनील वाघमारे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रतिमा व वारकरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, नेवासा हा धार्मिक क्षेत्र असलेला तालुका आहे. ज्ञानेश्वर सृष्टीसाठी सरकारने ८५० कोटींचा आराखडा तयार केला आहे. आराखड्यातील काम महायुतीचे सरकार येताच लगेच सुरू केले जाईल.
धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्र असलेल्या या नगरीत विठ्ठलराव लंघे यांचा विजय पक्का असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. भगवा ध्वज व धनुष्यबाण आमच्या उमेदवाराच्या हाताला शोभून दिसतो. सभेला विराट गर्दी आहे. त्यामुळे येत्या २३ तारखेला येथे फटाके नाही तर अॅटमबॉम्ब फुटतील. विकास हवा असेल तर परिवर्तन घडवा असे शिंदे म्हणाले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभी लंघे यांचा उल्लेख उद्याचे आमदार असा केला. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले. महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्याला आगळीवेगळी दिशा मिळाली. मतदारांच्या ताकदीवर नेवासा तालुक्यात परिवर्तन होईल, असे लंघे म्हणाले.
ते पैसे कोठून देणार?
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजना जाहीर झाली त्यावेळी विरोधकांनी टीका केली. मात्र, बहिणींच्या खात्यात पैसे आल्यानंतर आता त्यांनीही योजना जाहीर केली आहे. मात्र, त्यांचे सरकारच येणार नाही, तर पैसे कुठून मिळणार? असा सवाल त्यांनी केला. आमचे सरकार देणारे सरकार आहे, घेणारे नाही.
सत्ता आल्यावर चौकशी करणार: शिंदे
प्रास्ताविकात राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनी देवस्थानमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शनी देवस्थानमधील घोटाळ्याची चौकशी केली जाईल. शनिदेवाची एकदा वक्रदृष्टी पडली तर राजाचा रंक होण्यास वेळ लागत नाही. जे देवालाही सोडत नाहीत, ते विकास काय करणार? असा सवाल केला.