आमदार सत्यजित तांबे काँग्रेसच्या व्यासपीठावर; विखे-पाटील यांच्यावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2024 10:51 AM2024-10-30T10:51:54+5:302024-10-30T10:52:24+5:30

महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 mla satyajeet tambe on congress platform | आमदार सत्यजित तांबे काँग्रेसच्या व्यासपीठावर; विखे-पाटील यांच्यावर टीका

आमदार सत्यजित तांबे काँग्रेसच्या व्यासपीठावर; विखे-पाटील यांच्यावर टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर नाशिक: पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून विजयी झालेले आमदार सत्यजित तांबे हे मंगळवारी (दि.२९) संगमनेरात काँग्रेसच्या व्यासपीठावर आले. त्यांनी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

पदवीधर निवडणुकीनंतर तांबे प्रथमच कॉग्रेसच्या व्यासपीठावर आले. बाळासाहेब थोरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ते उपस्थित होते. अर्ज भरल्यानंतर जाणता राजा मैदानावर सभा झाली. यावेळी राज्यातील काँग्रेसचे पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व्यासपीठावर होते. तांबे हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

विखे यांच्या सभेत जयश्री थोरात यांच्याबाबत झालेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा संदर्भ देताना ते म्हणाले, १९९९ साली एनएसयूआयमध्ये काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून कोणत्याही निवडणुकीत खालच्या पातळीवरील राजकारण पाहिले नव्हते. २०२४ ही निवडणूक संगमनेर तालुक्याच्या इतिहासामध्ये वेगळी आहे. पुढील काळात या तालुक्याकडे पाहण्याची कोणाची हिम्मत व्हायला नको. आम्ही ही संस्कृती, हे लोक कधी पाहिले नाही. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे राजकारण ऐकत, वाचत आम्ही मोठे झालो. त्यांनी या तालुक्यासाठी स्वप्न पाहिले. आज जे म्हणताहेत ४० वर्षांत तालुक्यात काय झाले? त्यांना मला सांगायचे आहे, ४० वर्षांपूर्वीचा संगमनेर तालुका आणि आजचा संगमनेर तालुका हा खऱ्या अर्थाने विकासाचे आदर्श मॉडेल आहे.

'त्यांना' पराभव पचवता येत नाही 

विकासाची घडी मोडण्यासाठी ते संगमनेर तालुक्यात येत आहेत. आमच्या कार्यकर्त्यांवर ठरवून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना गरज असल्यानंतरच ते साष्टांग दंडवत घालतात आणि गरज संपली की, टायगर होतात. कधी मांजर होतात आणि अचानक टायगर होतात. त्यांना पराभव पचवता येत नाही, असे सत्यजित तांबे म्हणाले.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 mla satyajeet tambe on congress platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.