रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2024 12:11 AM2024-11-20T00:11:38+5:302024-11-20T00:12:04+5:30
कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रकार; काही पैसे पांढऱ्या पाकिटांमध्ये टाकलेले होते. तर काही पाकिटे रिकामी होती.
कर्जत/जामखेड: अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्या अधिपत्याखालील हळगाव (ता. जामखेड) येथील जय श्रीराम साखर कारखान्यातील एका अधिकाऱ्यास नान्नज गावात मतदारांना पैसे वाटप करताना पकडले. वायसेवाडी येथेही बारामतीच्या एका व्यक्तीस पैसे वाटप करताना पकडले. जामखेड तालुक्यातील नान्नज गावात मधुकर मारुती मोहिते याला पैसे वाटप करताना शहाजी गाडे, ओम मोरे, योगेश रजपूत, मंगेश काकडे, राज पवार, रघुनाथ मोहोळकर, महेंद्र मोहोळकर यांनी पकडले. त्यांनी त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस व फिरत्या पथकाने केलेल्या पंचनाम्यात या व्यक्तीकडे ४७ हजार रुपये सापडले आहेत. यातील काही पैसे पांढऱ्या पाकिटांमध्ये टाकलेले होते. तर काही पाकिटे रिकामी होती.
कर्जत तालुक्यातील वायसेवाडी येथेही अमोल दत्तू जमदाडे ही व्यक्ती मतदारांना प्रलोभन दाखवत असल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आली आहे. जमदाडे यांच्याकडे ५३ हजार रुपये आढळले आहेत. जमदाडे बारामती तालुक्यातील रहिवासी आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी नितील पाटील यांनीही या प्रकाराबाबत माध्यमांना माहिती दिली असून हे दोघेही या मतदारसंघातील नसताना मतदारसंघात आले. तसेच मतदारांना प्रलोभने दाखविताना पकडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिरा रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
रोहित पवारांकडून लक्ष्मीदर्शन : राम शिंदे
प्रशासनाने ताब्यात घेतलेले लोक हे रोहित पवारांसाठी पैसे वाटत होते. त्यांच्या कारखान्यातील हे कर्मचारी आहेत. प्रशासनाने या मतदारसंघात बाहेरील तालुक्यातील व जिल्ह्यातील लोकांना येऊ देवू नये अशी आमची मागणी होती. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
रोहित पवार हे शिंदे यांचेवर घसरले
या घटनेनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवार हे राम शिंदे यांचेवर घसरले. त्यांनी राम शिंदे यांची लायकी काय? असे विधान केले. एक लोकप्रतिनिधी अशाप्रकारे एका आमदाराबद्दल भाषा वापरत आहे यातून त्यांची संस्कृती दिसते. पैसे वाटपाच्या प्रकारामुळे पवारांचे पितळ उघडे झाले. त्यामुळे संतापातून त्यांनी अशी उद्धट भाषा वापरली अशी प्रतिक्रिया यासंदर्भात राम शिंदे यांनी दिली.
अधिकारी साखर कारखान्याच्या कामासाठी गेला होता : पवार
पकडलेला अधिकारी आमच्या कारखान्यातील आहे. मात्र, शेतकरी, ऊस तोडणी मजूर यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते गावात गेले होते, असे रोहित पवार यांचे म्हणणे आहे. पण ज्यांनी या अधिकाऱ्यास पकडले त्या व्यक्तीवर अनेक गुन्हे दाखल आहेत असा आरोप पवारांनी सोशल मीडियात केला आहे.