जनतेच्या प्रेमामुळे नवव्यांदा विधानसभेत कामाची संधी: बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2024 01:37 PM2024-11-14T13:37:03+5:302024-11-14T13:38:01+5:30
संगमनेरातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांशी संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : संगमनेर तालुक्यातील जनतेचे प्रेम आणि त्यांचा असलेला विश्वास यामुळे सलग नवव्यांदा विधानसभेत काम करण्याची संधी मिळत आहे. राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर मोठी संधी मिळाली, तिचा उपयोग संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी केला. संगमनेरकर नागरिकांचा सन्मान वाढेल, असेच राज्यात काम केल्याने चंद्रपूर ते पालघर कुठेही गेले तरी संगमनेरचा आदर केला जातो, असे मत संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार, आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
बुधवारी (दि.१३) आमदार थोरात यांनी निवडणुकीच्या प्रचारार्थ मालपाणी लॉन्स येथे उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, उद्योगपती डॉ. संजय मालपाणी, एकवीरा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. जयश्री थोरात, संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासट, सुधाकर जोशी, नीलेश जाधव, प्रकाश कलंत्री, ओंकार भंडारी, सोमेश्वर दिवटे, के. के. थोरात, सुभाष ताजणे कल्पेश मेहता, सीए. कैलास सोमाणी, राणीप्रसाद मुंदडा आदी उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले, आपण कधीही, कोणालाही विरोध केला नाही. विरोधकांना देखील मदत केली. विरोधकांचे कृषी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज आपण दिले आहे. अडथळे निर्माण केले नाहीत, त्यामुळे अनेक बाहेरील विद्यार्थी संगमनेरात शिक्षणासाठी आले. येथील अर्थव्यवस्था फुलली. या सर्व जमेच्या बाजू आहेत. हे वातावरण टिकवण्यासाठी एकत्र येऊन काम करायचे आहे. हीच संस्कृती आपल्याला पुढे न्यायची आहे.
दररोज साडेनऊ लाख लिटर दूध उत्पादन
संगमनेर तालुक्यातील बँका, पतसंस्थांध्ये एकूण ८ हजार ५३७ कोटींच्या ठेवी असून, सर्वच बँकांच्या येथे शाखा आहेत. तालुक्यात दररोज साडेनऊ लाख लिटर दूध उत्पादन होत असून, सहकारी संस्था, नोकरदार, पोल्ट्री व्यवसाय, फळबागा यामधून मोठी आर्थिक उलाढाल होते. संगमनेरमधील शेतकरी, व्यापारी प्रामाणिक असून येथे आनंदाचे वातावरण आपल्याला टिकवायचे आहे, असेही आमदार थोरात म्हणाले.