विरोधक विकासावर बोलायला तयार नाहीत: राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामस्थ, पदाधिकाऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2024 01:49 PM2024-11-13T13:49:52+5:302024-11-13T13:50:00+5:30
महायुतीच्या प्रचारार्थ एकरुखे, रांजणगाव खुर्द या गावांमध्ये आयोजित केलेल्या ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, राहाता : गणेश कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, या हेतूनेच चालवायला घेतला होता. आम्ही कारखाना सुरू केला म्हणूनच आज तो तुमच्या ताब्यात मिळाला आहे. आम्ही पुढाकार घेतला नसता तर शेतकऱ्यांच्या मालकीचा हा कारखाना खासगी माणसाच्या ताब्यात गेला असता. कारखान्याच्या प्रश्नाचेच भांडवल करून राजकारण करू पाहणारे विकासाच्या मुद्द्यावर बोलत का नाहीत? असा सवाल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.
महायुतीच्या प्रचारार्थ एकरुखे, रांजणगाव खुर्द या गावांमध्ये आयोजित केलेल्या ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या दोन्ही गावांमध्ये विखे पाटील यांच्या समर्थनार्थ मोटारसायकल रॅली काढली. आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, शेजारचे नेते आपल्या भागात येऊन संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत. यापूर्वी तेही मंत्री होते, पण या भागाकरिता दमडीचाही निधी ते देऊ शकले नाहीत. पालकमंत्री म्हणून संगमनेर तालुक्याकरिता आपण राजकारण आड येऊ न देता निधीची उपलब्धता करून दिली.
समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भूत त्यांनी जिल्ह्याच्या मानगुटीवर बसविले. हा कायदा करताना भविष्यात होणाऱ्या नुकसानीचे थोडेही काही वाटले नाही. आज जिल्ह्याच्या हक्काचे पाणी गेले, त्याचा शेतीक्षेत्राला मोठा फटका बसला. मात्र, यावर आज ते बोलायला तयार नाहीत, याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की, केवळ दहशतीचा मुद्दा हेच त्यांच्या प्रचाराचे भांडवल आहे. पण विकासाच्या मुद्द्यावर ते काहीच बोलायला तयार नाहीत. लोक प्रश्न विचारतील म्हणून प्रचाराची दिशा दुसरीकडे घेऊन जात आहेत.
शेतकऱ्यांना दिलासा
मागील अडीच वर्षात महायुती सरकारने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांचा लाभ शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक माणसाला झाला आहे. एक रुपयात पीक विमा योजनेपासून ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. वीज बिल माफीचा निर्णय महायुती सरकारने घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णयही भविष्यात महायुती सरकारच घेईल, असे त्यांनी आश्वासित केले.