कितीही संकटे आली तरी जनतेचे प्रश्न सोडविणार: प्राजक्त तनपुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2024 10:17 AM2024-11-06T10:17:21+5:302024-11-06T10:17:53+5:30
वाघाचा आखाडा परिसरात केला दौरा
लोकमत न्यूज नेटवर्क, राहुरी : सरकारने जाणून-बुजून मतदारसंघातील निधी रोखला. माझ्यावर ईडीची चौकशी लावली. मोठ्या प्रमाणावर मला त्रास देण्याचे काम विरोधकांनी केले, परंतु कितीही संकटे आली तरी सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला तडा न जाऊन देता प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहील. त्यात मी मतदार राजांशी कधीही गद्दारी करणार नाही, असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
वाघाचा आखाडा येथे आयोजित केलेल्या दौऱ्यात आमदार तनपुरे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी काशीनाथ गागरे होते. भाजप सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना न राबविल्याने तालुका ५० किलोमीटर रस्त्याला तालुका मुकला. रस्त्यांसाठी सायकल रॅली तसेच वेळोवेळी आंदोलने केली. तरीदेखील प्रश्न मार्गी न लागल्याने न्यायालयात धाव घेतली.
सहा महिन्यांनंतर स्थगिती उठली व थोडी फार कामे मार्गी लागली. काही लोक आपल्या कामांचे श्रेय घेत आहेत. दहा वर्षे आमदार असताना लोकवर्गणी करून डीपी बसविण्याची दुर्दैवी वेळ सर्वसामान्य जनतेवर आणली. राहुरी विधानसभा मतदारसंघात मंत्रिपदाच्या काळात नवीन सहा सबस्टेशन तर चार सबस्टेशनची क्षमता वाढवली. ज्या योजनांमधून डीपी मिळत होती, त्या योजना या सरकारने बंद केल्या. आपले सरकार आल्यानंतर प्रामुख्याने कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, दिवसा वीज, रस्त्याच्या तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच ग्रामीण भागातील प्रश्न प्रामुख्याने सोडविले जातील, अशी ग्वाही तनपुरे यांनी दिली.
यावेळी व्यासपीठावर काशीनाथ गागरे, रामभाऊ तारडे, गोरक्षनाथ धसाळ, करूभाऊ वाघ, कृष्णाजी तनपुरे, दत्तात्रय धसाळ, देवराम माळी, राजेंद्र सप्रे, उत्तम दौंड, रंगनाथ वाघ, पांडुरंग बुचुडे, दामोधर तनपुरे, सुभाष वाघ, शरद धसाळ, अशोक सप्रे, बाळासाहेब पटारे, रामनाथ तनपुरे, बबन आघाव, गणेश आघाव, सुनील सप्रे, सुरेश तनपुरे, चंद्रकांत वाघ, मनोहर तनपुरे, बी.जी. तनपुरे, किशोर दोंड, आदिनाथ तनपुरे, धनंजय सप्रे आदी उपस्थित होते.