निर्णय घेताना धाडस लागते, हसून चालत नाही: राधाकृष्ण विखे पाटील; बाळासाहेब सभेत थोरातांवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2024 10:53 AM2024-10-30T10:53:39+5:302024-10-30T10:54:59+5:30
विखे पाटील यांनी मंगळवारी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क, राहाता : विकास करण्यासाठी निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी धाडस लागते. केवळ हसून चालत नाही. हसून तुम्ही किती लोकांची जिरवली. आता जनता तुमची जिरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.
राहता येथे झालेल्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. विखे पाटील यांनी मंगळवारी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी विजय संकल्प मेळाव्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधला. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब म्हस्के पाटील, आमदार आशुतोष काळे, डॉ. सुजय विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, कपिल पवार, सुरेंद्र थोरात, सागर बोठे, दीपक रोहोम आदी याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी विखे पाटील म्हणाले, महायुती सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघातील खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला. निळवंडे कालव्याचे पाणी दिलेल्या शब्दाप्रमाणे आणले. तरुणांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीची उभारणी सुरू झाली. जिल्ह्याच्या नामांतराबरोबरच नेवासे येथील ज्ञानेश्वरसृष्टी, अहिल्यादेवींचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तुम्ही आमच्याकडे येऊन काहीही बोलायचे, ती तुमच्यासाठी लोकशाही असते, आम्ही थोडी टीका केली तर, लगेच लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप करता. लोकशाही कुठेही धोक्यात नाही, तर तुमचे पद धोक्यात आले आहे. त्यामुळेच तुम्ही अस्वस्थ झाला आहात. देशमुख यांच्या वक्तव्याचे आम्ही कधीही समर्थन केले नाही.
समन्यायीचे भूत मानगुटीवर बसवले
गणेश कारखाना चालवायला घेतला म्हणून तो शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला. संस्थांवर चर्चा करायची असेल तर एकदा समोरासमोर या. समन्यायी पाणीवाटप कायद्याचे भूत तुम्ही जिल्ह्याच्या मानगुटीवर बसविले त्याची किंमत मोजावी लागली, असे आव्हानही विखे पाटील यांनी दिले. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही थोरात यांच्यावर टीका केली.