जिल्ह्यात आठ मतदारसंघात बंडखोरी; सहा माजी आमदारांनी पक्षादेश झुगारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2024 10:59 AM2024-11-05T10:59:47+5:302024-11-05T10:59:47+5:30
पाच माजी आमदार अपक्ष किंवा इतर आघाड्यांकडून मैदानात उतरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर: बंडखोरीमुळे जिल्ह्यातील बारापैकी आठ मतदारसंघात तिरंगी लढती होणार आहेत. पाच माजी आमदार अपक्ष किंवा इतर आघाड्यांकडून मैदानात उतरले आहेत.
सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. सर्वच मतदारसंघात दुपारी तीनपर्यंत राजकीय घडामोडी, बैठका, मनधरणी सुरू होती. अकोले मतदारसंघात भाजपमध्ये असलेले माजी आमदार वैभव पिचड यांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवला आहे. श्रीरामपूर मतदारसंघात अजित पवार गटाने आमदार लहू कानडे यांना उमेदवारी दिली. पण येथे शिंदे सेनेकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही अर्ज कायम ठेवला आहे. ते दिवसभर नॉट रिचेबल होते. त्यामुळे येथे आता महायुतीचे उमेदवार आमनेसामने आहेत. नेवासा मतदारसंघात शिंदेसेनेकडून विठ्ठलराव लंघे उमेदवारी करत आहेत. तेथे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे प्रहार जनशक्ती पक्षाकडून रिंगणात उतरले आहेत.
श्रीगोंदा मतदारसंघातही माजी आमदार राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. पारनेर मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी हे अपक्ष मैदानात कायम आहेत. शेवगाव मतदारसंघातही राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले हे अपक्ष म्हणून मैदानात आहेत. शिर्डी मतदारसंघात भाजपच्या राजेंद्र पिपाडा यांनी माघार घ्यावी म्हणून पक्षाने त्यांना खास विमान पाठवून मुंबईला बोलविले होते. मात्र, त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. अहमदनगर मतदासंघात ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे.
श्रीगोंद्यात प्रतिभा यांच्याऐवजी विक्रम पाचपुते उमेदवार
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भाजपने अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, प्रतिभा पाचपुते यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. आता त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र विक्रम पाचपुते हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत.