शरद पवार गटाला जागा सुटली; पण शिवसैनिक आक्रमक, निवडणूक लढवण्यावर ठाकरे सेना ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 09:11 AM2024-10-29T09:11:58+5:302024-10-29T09:13:59+5:30
पक्षीय पातळीवर जी चूक झाली, ती स्थानिक पातळीवर सुधारणार; सेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांची पक्षश्रेष्ठींवर तीव्र नाराजी व्यक्त करीत संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी.
लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर: महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अहमदनगर शहर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेल्याने येथील शिवसैनिकांचा (ठाकरे गट) आक्रमक पवित्रा कायम आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत उपस्थित सेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी पक्ष तिकीट देत नसेल तर नगरची जागा आपण अपक्ष लढवावी, अशी मागणी लावून धरली. तसेच अर्ज भरल्यानंतर माघार घेऊ नका, अशी भूमिकाही उपस्थितांनी मांडली.
रविवारी (दि. २८) सायंकाळी शहरात सेनेचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक व शिवसैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सेना पदाधिकाऱ्यांसह उपस्थित शिवसैनिकांनी पक्षश्रेष्ठींवर तीव्र नाराजी व्यक्त करीत संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, सोमवारी झालेल्या बैठकीतही नाराजीचा सूर कायम होता.
सर्वांच्या संमतीनुसार २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर आणि माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. उमेदवारी दाखल केल्यानंतर माघार घेऊ नका, असे आवाहन याप्रसंगी उपस्थित शिवसैनिकांनी केले. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, संजय शेंडगे, प्रकाश पोटे, सचिन शिंदे यांच्यासह सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
कळमकरांच्या उमेदवारीला विरोध नाही
शिवसैनिकांच्या बैठकीत बोलताना गाडे म्हणाले, पक्षीय पातळीवर जी चूक झाली, ती स्थानिक पातळीवर सुधारून महाविकास आघाडी अधिक सक्षम करण्यावर आमचा भर आहे. काँग्रेसचे किरण काळेही मंगळवारी (दि. २९) अर्ज भरणार आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार कळमकरही याच दिवशी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे शिवसेनेकडूनही आम्ही अर्ज भरणार आहोत. महायुतीच्या उमेदवाराला पाडणे हाच आमचा उद्देश आहे.