अहिल्यानगरमध्ये २५ वर्षे प्रतिनिधित्व, यंदा उमेदवारच नाही; शिवसैनिकांच्या मनातील खदखद कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2024 09:07 AM2024-11-07T09:07:33+5:302024-11-07T09:10:47+5:30

शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचे दोन वेगवेगळे गट झाले असून, एक गट महायुतीमध्ये व दुसरा महाविकास आघाडीमध्ये आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही गटांकडून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार या मतदारसंघात उभा राहिलेला नाही.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 shiv sena representation in ahilya nagar for 25 years no candidate this year | अहिल्यानगरमध्ये २५ वर्षे प्रतिनिधित्व, यंदा उमेदवारच नाही; शिवसैनिकांच्या मनातील खदखद कायम

अहिल्यानगरमध्ये २५ वर्षे प्रतिनिधित्व, यंदा उमेदवारच नाही; शिवसैनिकांच्या मनातील खदखद कायम

लोकमत न्यूज नेटवर्क, केडगाव: विधानसभा मतदारसंघाच्या  अहमदनगर शहर निवडणुकीत २५ वर्षे शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रतिनिधित्व केले. परंतु, जागावाटपात यंदा शिवसेनेच्या हातून हा गड राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्याने मतपत्रिकेवरून शिवसेना निवडणूक आखाड्याच्या बाहेर पडली आहे. आघाडीचा धर्म म्हणून शिवसैनिक प्रचारात उतरतीलही; पण उद्धवसेना निवडणुकीत नसल्याची खदखद शिवसैनिकांच्या मनात कायम राहील.

शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचे दोन वेगवेगळे गट झाले असून, एक गट महायुतीमध्ये व दुसरा महाविकास आघाडीमध्ये सोबत आहे. महायुतीमध्ये नगर शहर मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेलेला आहे तर महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे गेला आहे. त्यामुळे या वेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही गटांकडून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार या मतदारसंघात उभा राहिलेला नाही.

नगर शहर विधानसभा मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मानला जात होता. शिवसेना उपनेते दिवगंत अनिल राठोड यांनी १९९०, १९९५, १९९९, २००४, २००९ अशा सलग पाच वेळा या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला. त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा गाजायच्या.

यापूर्वी नगर शहरात चार वेळा काँग्रेसने, एकदा जनता पक्षाने विजय मिळविला होता. मात्र त्यांनतर मतदारसंघात शिवसेनेच्या वादळापुढे १९९०च्या विधानसभा निवडणुकीपासून २००९ पर्यंत काँग्रेस व इतर पक्ष भुईसपाट झाले. महापालिकेतही शिवसेनेचेच वर्चस्व राहिले. सर्वाधिक नगरसेवक व सर्वाधिक महापौर शिवसेनेच्या नावावर आहेत.

नगर शहर मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेला. यामुळे शिंदेसेनेलाही येथे दावा करता आला नाही. कारण, या मतदारसंघात राष्ट्रवादीचा गेल्या १० वर्षांपासून आमदार आहे. त्यात उद्धवसेनेकडून मोठा दावा असतानाही उमेदवारी न मिळाल्याने उद्धवसेनेतील पदाधिकारी, शिवसैनिकांत नाराजीचा सूर आहे. असे असले तरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाआघाडीचा धर्म पाळण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाठिंबा दिला. मात्र, २५ वर्षांपासूनच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात प्रथमच शिवसेना पक्ष नसल्याची खदखद शिवसैनिकांच्या मनात कायम आहे.

जिल्ह्यात सेनेची सर्वाधिक ताकद नगरमध्येच

शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड हे शहराच्या राजकारणात शिवसेनेचे वर्चस्व टिकवून सतत प्रयत्नशील होते. महापालिकेतही शिवसेनेचा दबदबा आहे. मात्र, २०१४ पासून शिवसेनेला येथे दोनदा पराभवाचा सामना करावा लागला होता. तरीही नगर शहरावर शिवसेनेची पकड मजबूत होती. मात्र, आता शहर मतदारसंघात हा पक्षच मैदानात राहिला नाही.

पारनेरमधूनही शिवसेना मैदानात नाही

नगर शहर मतदारसंघानंतर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद पारनेर मतदारसंघात आहे. या मतदारसंघातून २००४, २००९, २०१४ अशा सलग तीनदा शिवसेनेने येथे वर्चस्व सिद्ध केले. २०१९ मध्ये शिवसेनेचा येथे पराभव झाला. यंदा मात्र हा पक्षच निवडणुकीत उतरला नाही.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 shiv sena representation in ahilya nagar for 25 years no candidate this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.