मोदींच्या मनात महाराष्ट्रासाठी जागा, विकासासाठी डबल इंजिन सरकार गरजेचे: जे. पी. नड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2024 01:24 PM2024-11-14T13:24:53+5:302024-11-14T13:26:54+5:30
शिर्डीच्या या पवित्र भूमीत साईबाबांनी 'सबका मालिक एक'चा संदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल विशेष जागा आहे. त्यामुळे हे राज्य पुढे नेण्यासाठी व येथे सुरू असलेले प्रकल्प आणखी गतीने होण्यासाठी महायुतीचे डबल इंजिन सरकार गरजेचे आहे, असा आशावाद भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी शिर्डीत व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ शिडी येथे बुधवारी (दि.१३) झालेल्या सभेत मंत्री नड्डा बोलत होते.
यावेळी उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कमलाकर कोते, राजेंद्र गोंदकर, सुरेंद्र थोरात आदींसह महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिर्डीच्या या पवित्र भूमीत साईबाबांनी 'सबका मालिक एक'चा संदेश दिला. त्याचप्रमाणे 'सबका साथ, सबका विकास' हा नारा देत मोदी सरकार गतीने पुढे चालले आहे. स्वातंत्र्यापासून जेवढे सत्ताधारी आले त्यांनी भ्रष्टाचारातून स्वतःची घरे भरण्याचे काम केले; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला विकासाच्या वाटेने नेले. कोरोनानंतर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान आदी देश आर्थिक गर्तेत सापडली असताना एकमेव भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे साऱ्या जगाने पाहिले. त्यावेळी जगाचा विकासदर मंदावत असताना भारताचा विकासदर वाढत होता. त्यामुळेच जगात भारताची अर्थव्यवस्था मोदींच्या कार्यकाळात ११व्या स्थानावरून ५व्या स्थानावर आली. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणून तुम्ही मोदींना साथ दिली तर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर येण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास मंत्री नड्डा यांनी व्यक्त केला.
राधाकृष्ण विखे म्हणाले, लाडक्या बहिणींसह केंद्राच्या योजना लोकांपर्यंत गेल्या आहेत. आघाडीचे कितीही नेते येऊ द्या, युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी त्यांच्या लाडक्या बहिणी असल्याने आमचा विजय पक्का आहे.
विखे यांनी केलेला विकास उल्लेखनीय : नड्डा
मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्यात खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी मिळवून दिल्या. नवीन औद्योगिकीकरण आणले, निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण केले. ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्पाचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील ही त्यांची कामे उल्लेखनीय असल्याने त्यांना पुन्हा विधासभेत पाठवा. केंद्रासह राज्य सरकार शिर्डीच्या विकासावर विशेष भर देईल, अशी ग्वाही मंत्री नड्डा यांनी दिली.
महाआघाडीने विकासाला ब्रेक लावला
महाआघाडीचे सरकार सत्तेत असताना केंद्राच्या प्रकल्पांना ब्रेक लावण्याचे काम केले. महाराष्ट्राच्या हितासाठी केंद्राने अनेक प्रकल्प दिले, मात्र आघाडी सरकारने सर्व प्रकल्प बंद पाडले. जातीच्या नावाने समाजात, देशात फूट पाडण्याचे पाप विरोधक करत असल्याचा आरोप मंत्री नड्डा यांनी केला.