उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 04:48 PM2024-11-05T16:48:12+5:302024-11-05T16:48:48+5:30
अवघ्या १५ सेकंदात राजकीय घडामोडी घडल्याने गाडे यांची बंडखोरी कायम राहिली.
Ahilyanagar Politics ( Marathi News ) : विधानसभेसाठी उमेदवारी माघारीचा सोमवारी अखेरचा दिवस होता. माघारीसाठी शेवटच्याक्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर उद्धवसेनेचे तिघे बंडखोर शेवटच्याक्षणी अर्ज मागे घेण्यासाठी कार्यालयात गेले; पण अर्ज दोघांनीच मागे घेतले. जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत गाडे यांनी त्यांचा अर्ज कायम ठेवला. त्यांना अर्ज दाखल करण्यास पंधरा सेकंद उशिरा झाला. अवघ्या १५ सेकंदात राजकीय घडामोडी घडल्याने गाडे यांची बंडखोरी कायम राहिली.
अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेले माजी महापौर संदीप कोतकर यांच्या पत्नी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी स्वतः तहसील कार्यालयात येऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याची भूमिका माध्यमांशी बोलताना कोतकर यांनी मांडली. त्यापूर्वीच अर्धा तास आधी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे अर्ज माघारीसाठी केंद्रावर दाखल झाले. ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात जात असताना त्यांना कुणाचा तरी फोन आला. त्यामुळे निवडणूक कार्यालयाच्या बाहेरच ते थांबले. तिथे सेनेचे पदाधिकारी जमले. त्यानंतर काही वेळातच माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे तिथे दाखल झाले. त्यांच्यात बराचवेळ चर्चा सुरू होती, मात्र निर्णय होत नव्हता.
अखेर अर्ज माघारी घेण्यासाठी शेवटचे १५ सेकंद उरलेले असताना गाडे, बोराटे, फुलसौंदर हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात गेले. गाडे यांचा माघारीचा अर्ज गिरीश जाधव यांच्याकडे तयार होता. परंतु, तरीही अर्ज दाखल करण्यास गाडे यांना विलंब झाला. उद्धवसेनेचे बोराटे व फुलसौंदर यांनी मुदतीत अर्ज मागे घेतले. परंतु गाडे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांचा अर्ज भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर व सचिन पारखी यांनी लोढा यांचा अर्ज मागे घेतला.
बैठकीत ठरले; पण केंद्रावर बिघडले
- महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु, उद्धवसेनेकडून गाडे, बोराटे व फुलसौंदर यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी सकाळी एका मंगल कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत अर्ज मागे घेण्याचे ठरले.
- त्यानुसार गाडे एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आले. त्यानंतर ज्येष्ठ नेते दादा कळमकर हेही आले. परंतु, सेनेत अंतर्गत चर्चा सुरू होती. त्याचवेळी सुवर्णा कोतकर केंद्रात दाखल झाल्या. त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर सेनेच्या गटातील हालचालींना वेग आला.