६ मतदारसंघांत 'तुतारी'-'ट्रम्पेट' आमने-सामने; सर्वाधिक ११ मतदारसंघांत 'ट्रम्पेट' चिन्हावर उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2024 12:51 PM2024-11-09T12:51:00+5:302024-11-09T12:52:44+5:30
निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिल्यापासून साधर्म्य असलेल्या तुतारी चिन्हाला अपक्ष उमेदवारांकडून मागणी वाढली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर: विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांपैकी सात मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हावर उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सात पैकी सहा मतदारसंघांत 'तुतारी वाजवणारा माणूस' आणि 'ट्रम्पेट' चिन्हे आमने- सामने आले असून, केवळ राहुरी मतदारसंघात कोणत्याही उमेदवाराला 'ट्रम्पेट' चिन्ह मिळालेले नाही.
निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिल्यापासून साधर्म्य असलेल्या तुतारी चिन्हाला अपक्ष उमेदवारांकडून मागणी वाढली होती. लोकसभा निवडणुकीत तुतारी चिन्हावर निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना चांगली मते मिळाली होती. याचा फटका शरद पवार यांच्या पक्षाला बसला होता. यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी पवारांच्या पक्षाने तुतारी चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती, परंतु निवडणूक आयोगाने चिन्ह कायम ठेवत 'ट्रम्पेट'चे भाषांतर 'ट्रम्पेट'च ठेवले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत चाललेले तुतारी चिन्ह 'ट्रम्पेट' नावाने ईव्हीएमवर दिसणार आहे.
शरद पवार यांचा पक्ष निवडणूक लढवत असलेल्या सात पैकी सहा मतदारसंघांत 'तुतारी वाजवणारा माणूस' आणि 'ट्रम्पेट' चिन्हे आमने- सामने आले आहेत. यामध्ये अहमदनगर शहर, शेवगाव, पारनेर, कोपरगाव, कर्जत, अकोले या मतदारसंघांचा समावेश आहे. यातील राहुरी मतदारसंघात 'ट्रम्पेट' चिन्ह कोणत्याही उमेदवाराला मिळालेले नाही. श्रीरामपूर, अकोले आणि पारनेर विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रीय समाज पक्षाला 'ट्रम्पेट' चिन्ह मिळाले आहे, तर कोपरगावमध्ये बळीराजा पार्टी, संगमनेरमध्ये समता पार्टी व श्रीगोंद्यात सैनिक समाज पार्टीला 'ट्रम्पेट' चिन्ह मिळाले आहे.
राहुरी मतदारसंघात संघर्ष टळला
जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघ वगळता अकरा मतदारसंघांत ट्रम्पेट चिन्ह आहे. याशिवाय आठ मतदारसंघांत शिट्टी, चौघांना रिक्षा, पाच मतदारसंघांत किटली चिन्ह उमेदवारांना मिळाले आहे, तसेच कपाट, सफरचंद, फुलकोबी, भेंडी, कचरा पेटी, मोत्यांचा हार, नरसाळे, रेझर, काचेचा पेला, जातं, स्टूल आदी चिन्हे अपक्ष उमेदवारांना मिळाले आहेत.
सर्वाधिक उमेदवार 'ट्रम्पेट'चे
जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांत शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वाधिक ७, भाजप व अजित पवारांची राष्ट्रवादी प्रत्येकी ५, शिंदेसेना ३, तर उद्धवसेना २ जागा लढवीत आहे, तर 'ट्रम्पेट' चिन्हावर सर्वाधिक ११ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.