महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर मोठी कारवाई; शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांसाठी बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 23:36 IST2025-02-02T23:07:01+5:302025-02-02T23:36:57+5:30
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर मोठी कारवाई; शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांसाठी बंदी
Maharashtra Kesari 2025: महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांसोबत हुज्जत घालणं दोन पैलवानांना चांगलेच महागात पडलं आहे. महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर कुस्ती परिषदेकडून कारवाई करण्यात आली आहे. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना पंचायत सोबत वाद घालणं भोवलं आहे. दोघांनाही तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली. शिवराज राक्षेने पंचांचा निर्णय पटला नाही म्हणून त्यांच्यासोबत हुज्जत घातली होती. पंचांची कॉलर पकडून त्यांना लाथ देखील मारली. हेच कृत्य शिवराज राक्षेला महागात पडलं.
६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती किताबाच्या स्पर्धेत महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. उपांत्य सामन्यात पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारत शिवीगाळ केली. यानंतर अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आणि मैदान सोडलं. त्यानंतर महाराष्ट्र कुस्ती परिषदेने दोघांवरही कठोर कारवाई केली आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेने बैठक घेऊन दोन्ही पैलवानांवर तीन वर्षांची बंदी घातली आहे. त्यामुळे शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये तीन वर्षे खेळता येणार नाही.
"पंचांनी दिलेल्या निर्णय बरोबर होता. खेळाडूंनी खिळाडूवृत्तीने खेळायला पाहिजे होतं. ते यावेळी घडलं नाही. त्यांनी पंचांना लाथ मारणे, शिवीगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोधण्यासारखं नाही. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला. शिवराज राक्षेला या स्पर्धेतून तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. त्यामुळे त्याला कुठेही खेळता येणार नाही. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या कुस्ती झाली. महेंद्र गायकवाड यांनी कुस्ती खेळत असताना हाफ टाईममध्ये पंचांसोबत वाद घातला, शिवीगाळ केली. आमच्या कार्याध्यक्षांवर सुद्धा अरेरावीची भाषा वापरली. हे एका खेळाडूला न शोभणारं आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही तीन वर्षासाठी निलंबित केले आहे," अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली.
दरम्यान, अहिल्यानगर येथे झालेल्या ६७ व्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापुरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला. एका गुणाने महेंद्रचा पराभव करत पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावला. या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर पृथ्वीराजने त्याच्या वडिलांना खांद्यावर उचलून घेत आपला आनंद व्यक्त केला.