महाराष्ट्र केसरीला दिमाखादार सोहळ्याने प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2025 22:06 IST2025-01-29T22:05:13+5:302025-01-29T22:06:16+5:30

वाडियापार्कवर कुस्तीचा थरार : माजी हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांची हजेरी

maharashtra kesari begins with a grand ceremony | महाराष्ट्र केसरीला दिमाखादार सोहळ्याने प्रारंभ

महाराष्ट्र केसरीला दिमाखादार सोहळ्याने प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर : गड किल्ल्यांची प्रतिकृती असलेले भव्य व्यासपीठ..समोर लाल मातीचे आखाडे, विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि कोल्हापुरी रणवाद्याची सलामी, अशा दिमखादार सोहळ्याने यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला बुधवारी सायंकाळी वाडियापार्कच्या मैदानावर प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी कोल्हापूर, पुणे, सोलापूरच्या तालीमीतील मल्लांनी मैदान गाजवित विजयी सलामी दिली.

येथील वाडिपार्कच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या दिवंगत बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघ व अहिल्यानगर कुस्तीगिर संघाच्या सुंयक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या ६७ वी अजिंक्य कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली.

गड किल्ल्यांच्या प्रतिकृती असलेले भव्य प्रवेशव्दार बनविण्यात आले आहे. क्रीडानगरीत उजव्या बाजूला गादीचे दोन, तर डाव्या बाजूला मातीचे दोन, असे चार मैदाने उभारण्यात आली आहेत. या मैदानांवर चारही बाजुने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. फिरत्या विद्युत रोषणाईने कुस्तीची मैदाने उजळून निघाले आहेत. हा दिमाखतदार सोहळा पाहण्यासाठी पहिल्याचदिवशी हजारो कुस्तीप्रेमींनी हजेरी लावल्याने पहिल्याच दिवशी वाडियापार्क मैदान हाऊसफुल्ल झाले. कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा,पुणे मुंबई, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील आठशेहून अधिक मल्लांनी नोंदणी केली आहे. ही स्पर्धा पुढील तीन दिवस चालणार आहे. राज्यभरातून दाखल झालेले मल्ल तसेच प्रमुख पाहुण्यांचे कोल्हापूर येथून आलेल्या रणवाद्याने स्वागत करण्यात आले. स्पर्धेसाठी राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय दर्जाचे १२५ प्रशिक्षक दाखल झाले असून, कुस्ती स्पर्धेचा क्षणक्षणाचा निकाल महाखेल या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरीचा निकाल एका क्लिकवर पाहायला मिळत आहे.

राज्यातील ४४ जिल्ह्यांतील विविध तालमीत प्रशिक्षण घेतलेले ८६० मल्लांनी नोंदणी केली आहे. राज्यभरातून मल्ल व त्यांचे प्रशिक्षक अहिल्यानगरमध्ये दाखल झाले आहेत. प्रत्येक कुस्तीसाठी वेगळे पंच असून, अचूक निकाल देण्याचा कुस्ती संघाचा प्रयत्न आहे.

कोल्हापूर, पुण्याच्या मल्लांनी पहिला दिवस गाजविला

महाराष्ट केसरी स्पर्धेसाठी सुमारे ४३ संघ सहभागी झाले आहेत. यातील बहुतांश मल्ल कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील तालमीत सराव करणारे आहेत. पहिल्या दिवशी पुणे आणि कोल्हापूरच्या मल्लांनी मैदान गाजविले.

पहिल्या दिवशी दंगल हाऊसफुल्ल

राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी वाडिपार्क मैदानावर दाखल झाले. स्पर्धेचा शुभारंभ सायंकाळी सात वाजता असला तरी दुपारी चारनंतरच कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला होता. कुस्ती पाहण्यासाठी दुपारीच कुस्तीप्रेमींनी गर्दी केल्याने महाराष्ट्र केसरी पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल झाले.

पहिल्या दिवशी ५७, ८६ गटात स्पर्धा

पहिल्या दिवशी बुधवारी माती व गादी गटात, अनुक्रमे ५७ व ८६ वजन गटातील कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. एकाचवेळी चार कुस्त्या खेळल्या जात असून, कुस्ती पाहण्यासाठी ठिकठिकाणी स्क्रिन लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मैदानपापासून दूर असलेल्यांना कुस्तीचा आनंद घेता येतो.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पहिल्याच दिवशी कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. कुस्ती स्पर्धेसाठी वाडियापार्क येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रवेशव्दारापासून ते मैदानापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींची प्रतिकृती

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी गड किल्ल्यांची प्रतिकृती असलेले प्रवेशव्दार उभारण्यात आलेले आहे. व्यासपीठाच्या मध्यभागी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची उभी प्रतिमा बसविण्यात आलेली आहे. उजव्या बाजूला जिजाऊ, तर डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे.

कोल्हापूरी रणवाद्याने स्वागत

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी होणारे तसेच विजयी मल्लांचे स्वागत करण्यासाठी कोल्हापूर येथून रणवाद्य पथक आलेले आहे. या पथकात हलगी, तुतारी वाजविणारे, अशा सात कलाकारांचा समावेश आहे.

Web Title: maharashtra kesari begins with a grand ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.