महात्मा गांधी पुण्यतिथी विशेष : अध्ययन केंद्रातून विचारांची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:10 PM2019-01-30T12:10:31+5:302019-01-30T12:11:25+5:30
जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यांनी मांडलेले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक थरांतून प्रयत्न झाले.
चंद्रकांत शेळके
अहमदनगर : जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यांनी मांडलेले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक थरांतून प्रयत्न झाले. अनेक विद्यापीठांत गांधी विचारांचा अभ्यासक्रम सुरू आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानेही अनेक महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम सुरू केला. येथील अहमदनगर महाविद्यालयात गेल्या दहा वर्षांपासून गांधी अध्ययन केंद्र सुरू आहे. या केंद्राच्या माध्यमातून गांधी विचारांची नव्या पिढीमध्ये पेरणी होत आहे.
अहिंसा, शांती, ग्रामस्वराज्य, ग्रामोद्योग, साधी राहणी, पर्यावरणरक्षण, आरोग्य, सर्वधर्म समभाव असे त्यांचे एक ना अनेक विचार आजच्या बदलत्या काळात सुसंगत असल्याचे दिसून येते. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राचे माजी प्रमुख बराक ओबामा हे सुद्धा गांधीजींना त्यांचे आदर्श मानतात. यातूनच गांधी विचाराची व्याप्ती स्पष्ट होते. अशा गांधी विचारांची पेरणी अध्ययन केंद्राच्या माध्यमातून होत आहे. प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक प्रा. डॉ. सुनील कवडे, संशोधन सहायक प्रा. फिरोज शेख हे या केंद्राचे कामकाज पाहत आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सन २००९मध्ये अहमदनगर महाविद्यालयात गांधी अध्ययन केंद्राला मान्यता दिली. गांधी विचारांचा प्रचार-प्रसार करणे या मुख्य उद्देशाने सुरू झालेल्या या केंद्रात सध्या ‘सर्टिफिकेट कोर्स इन गांधीयन स्टडिज्’ हा अभ्यासक्रम शिकविला जातो. गांधीवादी विचारवंतांची व्याख्याने, चर्चासत्र, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे गांधीविचार समाजात प्रसूत करण्याचे काम येथे सुरू आहे. यूजीसी दरवर्षी या केंद्रासाठी निधी देते. आतापर्यंत गेल्या आठ वर्षांत १८ लाखांचा निधी मिळालेला आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून निधी रखडल्याने महाविद्यालयीन स्तरावरच खर्च भागवला जात आहे. केंद्राने जिल्ह्यातील डिग्रस, जखणगाव, सोनेवाडी, गणेशवाडी, माळीचिंचोरे या शाळा दत्तक घेतल्या असून तेथील विद्यार्थ्यांना गांधी विचारांचे धडे दिले जातात. याशिवाय केंद्रात आतापर्यंत १५० पेक्षा जास्त व्याख्याने, चर्चासत्र झाली आहेत. प्रत्येक महिलादिनी समाजातील वंचित महिलांचा सन्मान केंद्राकडून केला जातो. जालना येथील गांधी विचार शिबिरात दरवर्षी येथील केंद्रातील विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. केंद्रामार्फत स्वच्छता अभियान, संविधान जागृतीसाठी प्रभातफेरी असे अनेक उपक्रम राबवले जातात.
‘तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नाही, तर विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेले आहे.सोन्या-चांदीचे तुकडे नव्हे, तर आरोग्य हीच खरी संपत्ती. भीती तुमच्या शरीराचा रोग आहे. तो तुमच्या आत्म्याला मारतो. त्या स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही, ज्यात चूक करण्याचे स्वातंत्र्य नाही. महात्मा गांधीजींच्या अशा एक ना अनेक विचारांनी तरूण भारावलेले आहेत. आमच्या अभ्यास केंद्रातून असेच विचार समाजात पोहोचवण्याचे काम सुरू आहे. - प्रा. डॉ. सुनील कवडे, संचालक, गांधी अध्ययन केंद