महात्मा फुले कृषी विद्यापीठात आरोग्यवर्धक चेरी टोमॅटोचे वाण विकसित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:59 AM2018-10-31T11:59:49+5:302018-10-31T12:00:29+5:30
यशकथा : टोमॅटोचा रंग पिवळा-लालसर आहे़ गावरान टोमॅटावर गेल्या पाच वर्षांपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये यावर संशोधन सुरू होते.
- भाऊसाहेब येवले (राहुरी, जि. नगर)
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने गावरान टोमॅटोवर संशोधन करून निवड पद्धतीने चेरी टोमॅटो-फुले जयश्री हा वाण विकसित केला आहे़ फुले जयश्रीमध्ये ज्यूसचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे़ हॉटेल, मॉल व मध्यमवर्गीय यांच्याकडून या वाणाला मागणी आहे़ फुले जयश्री या टोमॅटोच्या झाडाला ७ ते ८ टोमॅटो येतात़ कच्चे टोमॅटो खाण्यास उपयुक्त आहेत़ टोमॅटोचा रंग पिवळा-लालसर आहे़ गावरान टोमॅटावर गेल्या पाच वर्षांपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये यावर संशोधन सुरू होते.
चेरी टोमॅटो सिलेक्शन-फुले जयश्री अर्थात आर. एच. आर. सी. टी. १२-६ या नावाने विकसित करण्यात आला आहे़ फुले जयश्री या वाणाची वाढ अमर्याद आहे़ गावरान टोमॅटोपेक्षा ही फळे आकाराने काहीशी मोठी आहेत़ फुले जयश्री जातीच्या टोमॅटोचा आकार गोलाकार असून, एका झाडाला ७ ते ८ फळे लागतात, असे महात्मा फुले कृ षी विद्यापीठाचे संशोधक डॉ़ ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी सांगितले़ फळाचा रंग काहीसा नारंगी लालसर आहे़ महाराष्ट्रातील निवड पद्धतीने विकसित केलेली चेरीची फुले जयश्री हा पहिला वाण आहे़ ४० प्रकारचे विद्यापीठाकडे कलेक्शन होते़ त्यावर आधारित विविध वाणांतून निवड करण्यात आली आहे.
अन्य टोमॅटोप्रमाणे चेरी टोमॅटोची लागवड सरी पद्धतीने करता येते़ ठिबक अथवा फ्लो पद्धतीने या पिकाला पाणी देता येते़ राज्यात पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा शहरांत या चेरीला मागणी मिळू शकते़ २५० गॅ्रम अथवा ५०० ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये हे टोमॅटो विक्रीस उपलब्ध करून देता येतील, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील टोमॅटो सुधार प्रकल्पाचे प्रभारी डॉ़ ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी सांगितले़ चेरी फळाचे सरासरी वजन ६़३० गॅ्रम इतके आहे़ या वाणापासून हेक्टरी सरासरी उत्पन्न ५३़३१ टन आहे़ विद्राव्य घटकांचे प्रमाण ६़३२ टक्के आहे़ विषाणूजन्य रोगांना हे वाण मध्यम प्रतिकारक्षम आहे़ या वाणाला शहरी भागात अधिक मागणी आहे.
आरोग्याच्या दृष्टीने चेरी टोमॅटोला भविष्यकाळात मागणी वाढण्याची चिन्हे आहेत. टोमॅटो नाशवंत असल्याने काढणी व हाताळणी जपून करावी लागणार आहे़ मार्केटपर्यंत टोमॅटो पाठविण्यासाठी त्याचे पॅकिंग करणे गरजेचे आहे़ महाराष्ट्राच्या वातावरण व हवामानात चेरीचे पीक चांगल्या प्रकारे जोम धरू शकते, असा निष्कर्ष समोर आला आहे़ चेरीच्या झाडाची उंची १६० ते १८० सेंटिमीटर इतकी होते़ चेरी बियाणे राहुरी येथील महात्मा फु ले कृषी विद्यापीठाच्या टोमॅटो सुधार प्रकल्पामध्ये विक्रीस उपलब्ध आहे़ दहा गुंठ्यांसाठी ३० ते ४० गॅ्रम बियाणे पुरेसे ठरते़ चेरी संशोधनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक़े ़पी़ विश्वनाथा, संशोधन संचालक डॉ़ शरद गडाख, उद्यान विभागप्रमुख श्रीमंत रणपिसे, भाजीपाला पैदासकार डॉ़ मधुकर भालेकर यांचे मार्गदर्शन लाभले़