कर्जतला ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:18 AM2021-01-21T04:18:56+5:302021-01-21T04:18:56+5:30
विश्लेषण कर्जत : कर्जत तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रमुख चारही पक्षांनी समाधानकारक कामगिरी केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर ...
विश्लेषण
कर्जत : कर्जत तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रमुख चारही पक्षांनी समाधानकारक कामगिरी केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला. यापाठोपाठ भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
विशेष म्हणजे शिवसेनेनेदेखील उत्तम कामगिरी केली. मिरजगाव येथे त्रिशंकू अवस्था झाली आहे. कर्जत तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी राक्षसवाडी व निमगाव गांगर्डे या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ५४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यात राष्ट्रवादी काँग्रेसला २२, भारतीय जनता पक्षला २०, काँग्रेस आयला ९ आणि शिवसेनेला ५ याप्रमाणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पक्षनिहाय यश मिळाले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी भाजपचे विद्यमान मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. रोहित पवार यांनी गावागावात जाऊन युवा वर्गाला आपलेसे केले आहे. त्यांची हीच जादू या ग्रामपंचायत निवडणुकीत इफेक्टिव्ह ठरली. शिवाय महाविकास आघाडीच्या नेत्यात समन्वय दिसून आला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय व शिवसेना यांना समाधानकारक यश मिळाले.
याउलट भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये समन्वय नाही. हे या निवडणुकीत दिसून आले. याचे ताजे उदाहरण म्हणजे मिरजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे मिरजगाव येथील शहराध्यक्ष कैलास बोराडे यांनी महाविकास आघाडीबरोबर काम केले. आमदार रोहित पवार व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेक ग्रामपंचायतीत निवडणूक लढत असलेले उमेदवार व पॅनल प्रमुख यांच्याशी संपर्क ठेवून काम केले. असे चित्र भाजपच्या गोटात दिसले नाही. उलट भाजपकडे माजी मंत्री राम शिंदे यांनी तालुक्यातील विविध भागात केलेली विकासकामे सांगण्यासारखी होती. पण समन्वयाच्या अभावामुळे हे तसेच राहून गेले. या निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले आहे ते स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आहे. या निवडणूक निकालानंतर तरी भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, उपाध्यक्ष प्रवीण घुले, कैलास शेवाळे व युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले यांनी प्रचाराचे नियोजन केले. यामुळे काँग्रेस आयलादेखील समाधानकारक यश मिळाले.
...
फोटो २० कर्जत निवडणूक
..
ओळी- कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयानंतर जल्लोष करताना विजयी उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.