मतदान केंद्रावर महायुतीच्या उमेदवाराच्या स्लिप; शिर्डी मतदारसंघात व्हिडिओ व्हायरल
By शिवाजी पवार | Published: May 13, 2024 02:39 PM2024-05-13T14:39:40+5:302024-05-13T14:39:57+5:30
पोहेगाव केंद्रावर महाआघाडीच्या उमेदवारांचा आक्षेप
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदानावेळी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे महायुतीच्या उमेदवारांच्या स्लिप मतदान केंद्रात मिळून आल्या. त्यास विरोधी महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आक्षेप घेत निवडणूक कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे मतदान केंद्रावर काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
शिर्डीत महायुतीचे सदाशिव लोखंडे, महाआघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे व वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्यात लढत होत आहे. सोमवारी सकाळपासूनच तीनही उमेदवार मतदारसंघातील केंद्रांना भेट देत होते. दुपारी एक वाजेच्या दरम्यान भाऊसाहेब वाकचौरे हे पोहेगाव येथील मतदान केंद्रावर समर्थकांसह दाखल झाले. त्यावेळी प्रत्यक्ष मतदान केंद्रात महायुतीचे लोखंडे यांच्या नावाच्या स्लिपचे वितरण केले जात होते, असे वाकचौरे यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने यंदा घरोघर बीएलओ मार्फत स्लिप वितरित केल्या होत्या. त्यामुळे उमेदवारांच्या नावाने थेट मतदान केंद्रात स्लिप दिल्या जात असेल तर हा गंभीर प्रकार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांनी निष्पक्ष काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे हा प्रकार ताबडतोब थांबवावा, अशी मागणी वाकचौरे यांनी केली. तसा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाकचौरे यांच्या समर्थकांनी निवडणूक कर्मचाऱ्यांवर मोठा रोष व्यक्त केला.