महायुतीच्या सुजय विखेंची संपत्ती १२ कोटींनी वाढली, 'मविआ'च्या निलेश लंकेंच्या संपत्तीत झाली घट
By अण्णा नवथर | Published: April 24, 2024 06:38 PM2024-04-24T18:38:49+5:302024-04-24T18:40:15+5:30
विखे यांच्याकडे एकही वाहन नाही तर आमदार लंके यांच्याकडे कर्जावर घेतलेले चारचाकी वाहन आहे
अण्णा नवथर, लाेकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संपत्ती पाच वर्षांत १२ कोटींनी वाढ झाली आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार निलेश लंके यांची संपत्ती २९ लाखांनी घटली आहे.
महायुतीचे उमेदवार विखे यांच्याकडे २०१९ मध्ये १६ कोटी ८६ लाखांची संपत्ती होती. सध्या त्यांच्याकडे २९ कोटी १८ लाख एवढी संपत्ती आहे. तशी माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. विखे यांच्याकडे एकही वाहन नाही. आमदार लंके यांच्याकडे कर्जावर घेतलेले चारचाकी वाहन आहे. त्यांच्याकडे २०१९ मध्ये ६० लाख ६५ हजारांची संपत्ती होती. त्यात घट होऊन सध्या त्यांच्याककडे ४५ लाख ५४ हजारांची संपत्ती आहे. सुजय विखे यांच्याकडे ५४१ ग्रॅम सोने आहेत, तर लंके यांच्याकडे २० ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने आहेत. विखे यांच्याकडे ४ कोटी ६५ लाखांचे कर्ज असून, त्यांनी शेअर्स व म्युच्युअल फंडात ११ लाख ६ हजारांची गुंतवणूक केलेली आहे. आमदार लंके यांच्याकडे २० हजारांचे शेअर्स आहेत.
विखे यांच्या नावे बँकेत ५ कोटी ५७ लाख, तर त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या नावे १ कोटी ९१ लाखांची ठेव आहे. आमदार लंके यांच्या नावे ७ लाख ७६ हजार, तर त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्या नावे ३१ हजारांची ठेव आहे. आमदार निलेश लंके यांच्यावर आंदोलनाचे दोन गुन्हे दाखल असून, विखे यांच्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही.